आश्वासना नंतर जिवती मधील अन्नत्याग आमरण उपोषण तूर्त स्थगित
सहा महिन्यांत शेतकऱ्यांना जमीनपट्टे मिळावे! अन्यथा आंदोलनाची भूमिका वेगळी राहील-सुदाम राठोड
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीतील शेत जमिनीचे पट्टे त्यांना मिळाले पाहिजे व इत्तर मागण्या संदर्भात गेल्या ९ दिवसांपासून जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अन्नत्याग आमरण उपोषण सुरु झाले होते.दरम्यान या समितीत कुठलाही पक्षपात व जातीभेद न ठेवता सर्व पक्षिय व सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आले. एवढेच नाही तर ते या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते .उपोषणकर्त्यात सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, शबिर जहागीरदार, विनोद पवार, प्रेम चव्हाण,विजय गोतावळे,लक्ष्मण मंगाम, दयानंद राठोड, मुकेश चव्हाण व बालाजी वाघमारे यांचा प्रामुख्याने समावेश होता.या आंदोलनाची दखल घेत राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 14 डिसेंबरला नागपूर मुक्कामी महसूल विभाग, वनविभाग व जिवती तालुक्यातील शेतकरी बांधवांची एक बैठक घेतली .सहा महिण्याच्या आत जिवती तालुक्यातील जमीन पट्याची समस्या व अन्य प्रश्न सोडवू असे आश्वासन या बैठकीत त्यांना दिले. उपोषणकर्ते सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, शबीर जहागीरदार, मुकेश चव्हाण, दयानंद राठोड व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. उपोषणाच्या नवव्या दिवशी (आज दि.15 डिसेंबरला )सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी माने यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.या वेळी देवराव भोंगळे, पांडुरंग जाधव व शेतकरी बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते. जिवती तालुक्यातील समस्या व प्रश्न दिलेल्या मुदतीत सुटले नाही तर परत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे सुदाम राठोड यांनी म्हटले आहे