मानवत येथील हरितक्रांती जल व भूमी परीक्षण प्रयोगशाळा व कृषी विभागाचा संयुक्त जनजागृती उपक्रम
म

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत : जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून सेलू तालुक्यातील वालूर (ता. सेलू, जि. परभणी) येथे माती व पाणी परीक्षणाबाबत जनजागृती करणारा कार्यक्रम दि. २५ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. तेजस्वी विकास संस्था, पोहंडूळ तालुका मानवत संचलित हरितक्रांती जल व भूमी परीक्षण प्रयोगशाळा, मानवत तसेच कृषी विभाग, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या काळात रासायनिक खतांचा वाढता वापर, जमिनीतील सेंद्रिय कर्बाची घट आणि अन्नद्रव्यांचा असमतोल यामुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. माती परीक्षणाच्या आधारे योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात वाढ होते, असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमात श्री. अविनाश बालटकर यांनी माती नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत स्पष्ट करत नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रदीप शेळके यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासह कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच ‘महा विस्तार AI’ ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपात कृषी सल्ला उपलब्ध होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमांतर्गत रब्बी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे वालूर परिसरात माती व पाणी परीक्षणाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.









