इंटॅग्लिओ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत रणसिंग महाविद्यालयाने मारली बाजी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (AIMS), बारामती येथे 14 व 15 फेब्रुवारी रोजी इंटॅग्लिओ सिरीज 2025 या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेने विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये विकसित करण्याची, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची एक संधी दिली आहे तसेच मौल्यवान अनुभव मिळवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या स्पर्धेमध्ये एकूण सहा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कल्चरल कनेक्ट, सोलो डान्स, कॉमेडी कट्टा, रिल्स स्टार, गायन इत्यादी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपली कौशल्ये सादर केली व घवघवीत यश संपादन केले. कल्चरल कनेक्ट स्पर्धेमध्ये काजल मदने व ऐश्वर्या रणवरे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. सोलो डान्स या स्पर्धेमध्ये सौरभ नवगण या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. कॉमेडी कट्टा या स्पर्धाप्रकारात सौरभ नवगण, मानसी वाघमारे, विद्या भोसले, रणजीत वाघमारे, दत्ता जाधव आणि यशराज निंबाळकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गाडी क्रमांक 1552 ही प्रहसन सादर करून प्रथम क्रमांक मिळवला तसेच रिल्स स्टार स्पर्धा प्रकारामध्ये प्रसन्न देशपांडे या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय केसकर व उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विद्या गुळीग यांचे मार्गदर्शन मिळाले. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालयातील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांमध्ये प्रगती करण्याची व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी नेहमीच दिली जाते आणि त्याचेच हे फलित आहे असे गौरवोद्गार काढले. या सर्व विद्यार्थ्यांवर संस्था पदाधिकाऱ्यांकडूनही कौतुकांचा वर्षाव होत आहे.