खेर्डा महादेव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची अर्जुन महाराज मोटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
खेर्डा महादेव येथे जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु अनुग्रह दिन तसेच शिवजन्मोस्तवानिमित्त प्रसिद्ध भारुडकर श्री ह भ प त्रिंबक महाराज आमले यांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज 21 फेब्रुवारी 2024 रोजी श्री ह भ प अर्जुन महाराज मोटे पळशीकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. अशी माहिती बाळू महाराज आमले यांनी दिली. कार्यक्रमाविषयी बोलताना बाळू महाराज म्हणाले की, माघ शुद्ध दशमी हा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गुरु अनुग्रह दिन असून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्त गावातील प्रसिद्ध भारूडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज आमले यांनी मागील चार वर्षापासून गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यावर्षी 19 फेब्रुवारी रोजी म्हणजेच शिवजयंतीच्या दिवशी ही तिथी येत असल्याने गावातील तरुणांनी शिवजयंतीचा कार्यक्रम या सप्ताहामध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानिमित्त शिवजयंतीच्या मुख्य दिवशी श्री ह भ प योगेश महाराज गायके पोलीस अधिकारी तीर्थपुरी पोलीस स्टेशन यांचे शिवजयंती विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी या सप्ताहातील गाथा पारायणाची तसेच श्रीमद् भागवत कथेची सांगता झाल्यानंतर त्रिंबक महाराज आमले यांचे कनिष्ठ चिरंजीव श्री प्रताप आमले यांचे शुभ हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेची व श्रीमद् भागवत महापुराण ग्रंथाची यथोचित पूजा करण्यात आली. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत श्री ह भ प अर्जुन महाराज मोटे पळशीकर यांचे सुश्राव्य असे काल्याचे किर्तन झाले, त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक श्री त्रिंबक महाराज यांचे शुभ हस्ते महाआरती झाली व त्यानंतर त्यांच्या वतीने सर्वांना काल्याचा महाप्रसाद झाला. या कार्यक्रमासाठी परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरीचे कार्यकारी अधिकारी अॅड श्री मुकुंदराव चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. त्रिंबक महाराज आमले यांचे चिरंजीव प्रताप आमले यांनी कार्यक्रमासाठी योगदान लाभलेल्या सर्व वारकरी मंडळींचे, स्वयंसेवकांचे व समस्त गावकरी मंडळींचे ऋण व्यक्त करून आभार मानले. अशी माहिती श्री बाळू महाराज आमले यांनी दिली.