ताज्या घडामोडी

नंदुरबारमध्ये प्राथमिक व उच्च माध्यमिक विभागांसोबत चर्चा

शिक्षण क्षेत्रातील बदलांसाठी शिक्षकांचे सहकार्य गरजेचे!

आ. सत्यजीत तांबेंनी व्यक्त केली भावना

शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शिक्षक हा सरकारी शिक्षण व्यवस्थेतील खूप महत्त्वाचा घटक आहे. सरकारला शिक्षण व्यवस्थेत कोणताही बदल आणायचा असेल, तर तो शिक्षकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे सरकारने शिक्षकांच्या मागण्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करत विशिष्ट कालावधीत तोडगा काढला पाहिजे, अशा भावना आमदार सत्यजीत तांबेंनी व्यक्त केल्या.
शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे आ. सत्यजीत तांबेंनी गुरुवारी नंदुरबार येथील जिल्हा परिषद येथे प्राथमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत शिक्षक बदली, पदोन्नती व वेतनवाढी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या वेळी हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश आ. तांबेंनी दिले.
भरती करण्याआधी जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करावी. शिक्षक पती व पत्नी यांची नेमणूक एकाच ठिकाणी करावी. मुख्याध्यापक हे पद पदोन्नतीने भरण्यात यावे. शालार्थ प्रणालीचे मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात यावे. सातवा वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हफ्ता जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मिळावा. अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन निधी अभावी होत नाही. ते वेतन नियमित व्हावे, अशा प्रमुख प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, वेतन अधीक्षक प्रमोद पाटील, उपशिक्षणाधिकारी अनिस पठाण, संघटनेचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close