श्रीराम’ प्राणप्रतिष्ठा निमित्त पाथरीच्या परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात उत्सव साजरा



जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त देशभरात सर्वत्र उत्सवाचे व उत्साहाचे वातावरण असून त्यानिमित्त साई मंदिरातही उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नेहमीप्रमाणे मंदिर व मंदिर परिसराची विशेष साफ सफाई करून घेण्यात आली. त्यात विशेष बाब म्हणजे परभणीचे परम साईभक्त श्री नागेंद्र अनंतवार अण्णा यांनी द्वारकामाई सारवण्यासाठी परभणी येथून गीर गाईच्या शेणाची व्यवस्था केली.मंदिर शिखरावर सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आॅपरेशन विनयजी खानोलकर तसेच श्रीकांत जी दुबे व्हाईस प्रेसिडेंट प्लॅन्ट हेड महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी यांचे शुभ हस्ते गुढी उभारण्यात आली तसेच अॅड. अतुलराव चौधरी व्यवस्थापकीय विश्वस्त यांचे शुभ हस्ते नवीन निशाण/ध्वज उभारण्यात आले. मंदिर, द्वारकामाई मंदिर, ध्यानमंदिर याठिकाणी समया, पणत्या लाऊन दिपोत्सव साजरा केला. मंदिरात दिवसभर गीतरामायण, रामरक्षा, रामनामाचा जप व हनुमान चालीसा चालू ठेवन भक्तिमय वातावरणाची निर्मिती करण्यात आली. सकाळी ८:०० वाजता तेजस अतुलराव चौधरी यांचे शुभ हस्ते ‘प्रभू श्रीरामचंद्र परिवारस’ महाभिषेक करण्यात आला. मंदिराच्या शिखरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली. दुपारी साईबाबांच्या महाआरतीनंतर भक्तांना खिचडी व बुंदीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री नरेंद्र अनंतवार अण्णा यांचे शुभहस्ते आतिषबाजी करण्यात आली. तसेच दुपारी तीन ते पाच या वेळेत, श्री ह भ प योगेश महाराज गायके, तीर्थपुरी यांचे श्रीराम जन्म विशेष सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. समितीच्या वतीने श्री ना के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शुभ हस्ते महाराजांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. परमपूज्य श्री साईबाबा हे हनुमंताचे अवतार आहेत असा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राम्रुत याग्रंथात उल्लेख आलेला आहे. या जन्मी परमपूज्य श्री साईबाबा चे कुलदैवत हनुमान आहे. हनुमामाचे दैवत प्रभू श्रीराम आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिर पाथरी येथे परम पूज्य श्री साईबाबांच्या पादुका नेण्यात आल्या, तेथील मंदिराच्या व्यवस्थापनामार्फत साईबाबांच्या पादूकांची पाद्य पूजा करण्यात आली. अशी माहिती श्री साई स्मारक समितीचे प्रताप आमले यांनी दिली.