शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

शिक्षणामुळे धाडस आणि आत्मविश्वास निर्माण होतो- सौ.भावनाताई नखाते
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आपल्या देशातील अनेक महिलांनी सर्वच क्षेत्रांमध्ये जसे की क्रीडाक्षेत्र ,कलाक्षेत्र, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक ,राजकीय अशा अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे , त्यांचा आदर्श आपणासमोर आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे आपणासाठी खुली केली आणि खऱ्या अर्थाने महिलांना सामाजिक अस्तित्व निर्माण करून दिले. शिक्षण हे सक्षम बनण्याचे तसेच अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे शिक्षणाशिवाय प्रगती धाडस आणि आत्मविश्वास निर्माण होऊ शकत नाही असे प्रतिपादन असे वक्तव्य परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा तथा वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी च्या सचिव सौ. भावनाताई अनिलराव नखाते यांनी केले.
दिनांक 3 जानेवारी 2024 बुधवार रोजी शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या सौ. सुरेखाताई आमले,सौ. मीराताई सरोदे ,सौ. मीनाताई गिराम, सौ. राधाताई जाधव तसेच वाल्मिकी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पाथरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी. यु. बिडवे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री एन. एल.गोरे, व्यवस्थापक श्री ए.यु. नखाते आयटी विभाग प्रमुख श्री जी.पी. होगे ,शाळेचे मुख्याध्यापक श्री एन. इ. यादव, प्राचार्य श्री के. एन. यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित भित्तिपत्रकाचे, मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक के. एन. डहाळे यांनी केले. विद्यालयातील अनेक मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. बालासाहेब गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.