ताज्या घडामोडी

विविध संघटनांच्या उपोषण व धरणे आंदोलनाला खा.अशोक नेते यांची भेट

मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध संघटनांच्या वतीने नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आले. त्यांची खा.अशोक नेते यांनी भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच त्या मागण्या शासनाकडे मांडून त्यावर सकारात्मकरित्या तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बंगाली समाजाचे साखळी उपोषण
निखिल भारत बंगाली समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील ५५ बंगाली माध्यमाच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांची पदभरती करावी, तसेच दोन्ही जिल्ह्यातील पुनर्वसित बंगाली बांधवांना शेतजमिनीचा मालकी हक्क मिळावा यासाठी यशवंत स्टेडियमवर साखळी उपोषण सुरू होते. खा.अशोक नेते यांनी त्यांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी बंगाली बांधवांनी त्यांची व्यथा सविस्तरपणे खा.नेते यांना सांगितली. इतर राज्यात बंगाली बांधवांना मिळणाऱ्या सवलती महाराष्ट्रातही मिळाव्या अशी मागणी त्यांनी केली. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा.नेते म्हणाले.

आशा वर्कर व पोलिस पाटलांना सकारात्मक आश्वासन
अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटना व आशा वर्कर संघटना, तसेच पोलिस पाटील संघटनेच्याही मागण्या खा.नेते यांनी जाणून घेतल्या. गावातील तंटे, भांडण मिटवण्याची पोलीस पाटलाची महत्वाची भूमिका असते. दोन्ही बाजू समजून घेऊन पोलिस स्टेशन किंवा इतर भानगडी न करता वाद मिटवण्यात पोलिस पाटलांची भूमिका महत्वाची असते. सार्वजनिक जीवनात महत्वाची जबाबदारी पार पाडताना त्यांचे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. शासनाकडून मिळणाऱ्या अल्पशा मानधनात कुटुंबाचे व मुलाबाळांचे संगोपन, शिक्षणाची जबाबदारी पार पाडणे त्यांना कठीण होते. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे ही मागणी रास्त असल्याचे सांगत खा.अशोक नेते यांनी शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या
व्हाईस आॅफ मीडिया पत्रकार संघटनेच्या मागण्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या लाक्षणिक उपोषण आंदोलनालाही खा.नेते यांनी भेट दिली. राजकारण, समाजकारण, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या चार आधारस्तंभांपैकी पत्रकारिता हे चौथा स्तंभ आहे. त्यामुळे अशा महत्वाच्या समाजघटकाच्या मागण्यांकडे शासन निश्चितपणे लक्ष देईल, असा विश्वास व्यक्त करत मी व्यक्तीश: सर्वांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवेल, असा दिलासा खासदार नेते यांनी उपोषण, धरणे आंदोलन करणाऱ्यांना दिला. यावेळी संबंधित संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close