ताज्या घडामोडी

आरोग्य सुविधेबाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक -जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कोविडसारख्या महामारीत शासनाच्या आरोग्य विभागाने अत्यंत चांगले काम करून दाखवले आहे. यामुळे शासनाच्या आरोग्य सुविधेबाबत जनतेमध्ये निर्माण झालेला हाच विश्वास कायम ठेवून केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्यमान भव’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात यावी, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय ‘आयुष्यमान भव’ या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. गावडे हे बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकरी डॉ. प्रताप काळे, प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, महिला बाल विकास अधिकारी कैलास तिडके, विशाल जाधव, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांची उपस्थिती होती.

‘आयुष्यमान भव’ ही मोहीम देशभर राबविण्यात येत असून, आजच राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक सुविधा जनतेला उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत ‘आयुष्मान भव’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान व आरोग्य मेळावे, रक्तदान शिबीर, अवयव दान जनजागृती मोहीम, आयुष्यमान ग्रामसभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांची आणि 18 वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी असे विविध आरोग्यविषयक उपक्रम विशेष मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. तसेच आरोग्य सेवेपासून जिल्ह्यातील कोणीही वंचित राहू नये, याची दक्षता घेऊन नियोजन करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी दिल्या.

आयुष्मान भव ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या माध्यमातून आरोग्य केंद्रांवर आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान व आरोग्य मेळावे, प्रत्येक गाव आणि पंचायतीमध्ये आयुष्मान सभा, मुलांची आणि पुरुषांची आरोग्य तपासणी करणे हे या मोहिमेचे स्वरुप आहे. तसेच लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागाने क्षयरोगासारखे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार तसेच सिकलसेलसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय आणि नर्सींग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांनी केले. तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम यांनी आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close