मानवत येथे मुस्लिम समाजाच्या वतीने पाऊस पडावा यासाठी सामुहिक नमाज पठण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.त्यामुळे पिके करपू लागली आहेत.तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असून, जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे.एकंदरीत दुष्काळाची छाया गडद झाली आहे.हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा म्हणून मानवत येथील मुस्लिम बांधवांनी सलग तीन दिवस नमाज चे आयोजन केले आहे. आज दि.6 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 9:30 वाजता पालोदी रोड मोठी ईदगाह येथे मौलाना सुलतान मिल्ली, यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो बांधवांनी एकत्रित येऊन नमाज अदा केली.
संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून सर्वांची सुटका करण्यासाठी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली.
या विशेष नमाजमध्ये हाताचे पंजे उलटे ठेवून झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागून पावसासाठी अल्लाहकडे दुवा मागण्यात आली. दुवा मागताना अनेकांचे डोळे पाणावले. अल्लाह तू दयाळू आहेस, आम्हाला माफ कर आणि सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे, तुझ्याकडे दयेची भीक मागतो, या नैसर्गिक संकटातून आम्हाला वाचव, मोहम्मद पैगंबरांनी जो सत्यमार्ग दाखविला, त्या मार्गावर चालण्याची सर्वांना सद्बुध्दी दे, तू या संकटातून सुटका करु शकतोस, भरपूर पाऊस पडू दे, अशी दुवा यावेळी करण्यात आली.
हे नमाज चे आयोजन तहफ्फुज खत्मे नबुववत ग्रूप मानवत यांच्या वतीने ठेवण्यात आले होते.