उत्तराच्या नक्षञाने जिल्ह्यातील काही तालुक्यात तलाव व बोड्या झाले ओवरफ्लो
पिकांवरिल रोगाने शेतकरी ञस्त.
हलके धान कापणीला व मध्यम धान निसवले तरी भारी गर्भात.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
गडचिरोली-: मृग,आर्द्रा, पूनर्वसू, पुष्य, आश्लेषा व मघा या सहाही पावसाच्या नक्षत्रात दोन-चार दमदार सरी कोसळल्या अन्यथा केवळ हलका चिखल्या पाऊस पूर्वाच्या पूर्वीपर्यंत जलसाठे अर्धे भरले पण ऐन रोवणीला पाण्याची मोठी टंचाई झाली.माञ धानपीक पाण्याविना आणि कीड रोगांनी संकटात सापडला असतांना बरोबर मोक्याची क्षणी पूर्वाचा पाऊस बरसला. अगदी तोच अंदाज आणि पाण्याची धार उत्तराच्या पावसाने कायम ठेवल्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात तलाव, बोड्या, खड्डे व तुडुंब भरून ओवरफ्लो झाले आहेत. एकीकडे जलस्रोत भरल्याने शेतकऱ्याला आनंद जरी असला तरीपण धानपीकांना अनेक कीड-रोग असल्याने धानपीक संकटाच्या घेऱ्यात कायम आहेच.यंदाच्या पावसाळ्याचा अंदाज फार वेगळाच राहिला. पावसाच्या नऊपैकी आठवा नक्षत्र उत्तरा 26 आक्टोबरला संपणार आहे. म्हणजेच पावसाळा संपण्यास एक नक्षत्र अर्थात 13 दिवस बाकी आहेत. आठव्या नक्षत्राच्या अखेरीस मागे वळून पाहिल्यास, पहिला नक्षत्र मृग तेराही दिवस ओला राहिला. तोच चिखल आर्द्रात पसरल्याने धान पेरण्या चिखलातच कराव्या लागल्या. आर्द्राच्या संपताच पेरणी संपली. पण शेतात जलसिंचन सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मृगपूर्व पेरणी केल्याने आर्द्रा शेवटी आलेल्या धोधो पावसाने रोवणी सुरू केली. पूनर्वसूत दोन-तीन दिवस त्याच धारेचा पाऊस पडला. त्यानंतर अख्खा पूनर्वसू, पुष्य, आश्लेषा आणि मघा कोरडेच गेले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पाचवा नक्षत्र आश्लेषाच्या संपण्याच्या आधीच धानपीक रोवणीची कामे आटोपली. पण जेव्हा धान वाफे रोवणीची झाली तेव्हा पावसाची नितांत गरज असतांना मधातली पूनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा ही चारही नक्षत्रे पावसाविना गेली. अधामधातल्या पावसाळा ऋतूदर्शक सरींनी हजेरी लावली. पण रोवणीसाठी जमेल तिथून इकडून तिकडून जीवाचे रान आणि पैशाचे पान करून पाणी शेतात आणत रोवणी पुर्ण करण्यात आली. भर पावसाळ्यात पाण्यापावसाचा पत्ता नव्हता. या दरम्यान धानाला खोडखिडा लागला पण गादमाशीने पार घेरून टाकले. आजही गाद माशीने धानाला सोडलेले नाही. उत्पादनात घट होण्याचा अंदाज खरा ठरू पाहतोय.सहावा नक्षत्र मघाच्या शेवटच्या दिवशी मुसळधार पाऊस आला. त्यावेळी शेतकरींचे आशा पल्लवित झाले.दुसऱ्या दिवसापासून सातवा नक्षत्र पूर्वाला सुरूवात झाली. आणि काय जादूची कांडी फिरवल्यासारखी पावसाचा अनोखा अंदाज, रूप पहायला मिळाला. पूर्वाचा पाऊस जोरदार पडला. दोन-तीन दिवस सोडल्यास अख्ख्या नक्षत्रात पाऊस पडला. यंदाच्या आतापर्यंतच्या पावसाळ्यात याच नक्षत्रात मुसळदार पाऊस कोसळला. हाही या नक्षत्राचा विक्रमच म्हणावा लागेल. पूर्वाने तलाव, बोड्या, खड्डे शंभर टक्के भरले. धानपीक पावसात भिजून गेला. पुर्वाच्या पाण्याची धार उत्तराने पण चालू ठेवली. उत्तराने तुडुंब जलसाठे पाणी बाहेर फेकू लागले आहेत. मात्र गादमाशी कीड जैसे थे आहे.आता पिकांना कडा-करपा रोगाने ग्रासले आहे. उत्तरा नक्षत्राचा पाऊस कीड-रोग घेऊन जातो असे जाणकारांचे म्हणने आहे.माञ यंदा हा समज खोटा ठरला आहे. जिल्हात हलके धानपीक आता कापणीला आले असतांना पाऊस थांबता थांबेना त्यामुळे धानपीक जमिनीवर पडण्याची भीती घोंघावत आहे. दोन दिवसापुर्वी जिल्ह्यातील काही गावात उत्तरातील मुसळधार पाऊस आला. पावसाचा हाच रूप पुढे अवतरल्यास हलक्या आणि निसवलेल्या मध्यम धानपीकाची हानी होऊ शकते. भारी धानपीक सध्या गर्भा-पोटऱ्यात आहे. सुरवातीला पावसाचा अंदाज मंद होता. मध्यंतरी गायब झाला आणि जाता जाता पाऊस फारच फॉर्मात आल्याचे दिसते. पावसाळ्याचे नऊही नक्षत्र संपण्यास सध्या एक नक्षत्र उरलेला आहे.