नेरी येथील रस्त्याची दुरावस्था
उपसंपादक:विशाल इन्दोरकर
नेरी गावातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एक म्हणजे सावरगाव रोडलगत शंकरजी च्या मंदीरापासून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ विभाग पर्यंतचा रस्ता. पेठ विभाग, तसेच सरडपार म्हसली येथून येणारे जाणारे, तसेच नेरीतील पुष्कळ लोकांची वाताहत, सोबतच सामानांची ने आन करणारे वाहन, रेती ची ट्रॅक्टर अशा अनेक कारणांनी हा रस्ता दिवस-रात्र व्यस्त असतो. परंतु खूप वर्षांपासून हा रस्ता कधी पक्का करण्यात आला नाही. जे काही तुटपुंजे उपचार करून रस्ते डागडुजी करण्यात आली ती सर्व निरर्थक ठरली. सध्या या रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे. खाचखळगे गड्डे आणि उबडखाबड रस्ता असल्याने चारचाकी दुचाकी वाहनांसहित पायी चालणाऱ्यांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याकडे नेहमीच शासनाची उदासीनता दिसून आलेली आहे. पेठ विभागातील लोकांचे तर म्हणणे आहे की, या रस्त्याला चिमूर-नागभीड क्षेत्राचे आमदार यांचे कडून रस्ता पक्का करणे करिता मंजुरी तसेच निधी मंजूर करण्यात आला. परंतु काही मध्यस्तींनी हा रस्ता पक्का न करता निधी इतरत्र वळविला आहे. करिता लोकांची अशी मागणी आहे की या मंजुरीची सत्यता तपासून पाहणे आणि जर ती खरी असेल तर त्यास मंजूर झालेला निधी कोणी कुठे व का पळविला याचा शोध घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाही करण्यात यावी. आणि सदर मुद्द्याकडे आमदार व ग्रामपंचायत यांनी जातीने लक्ष देऊन हा रस्ता पक्का करून देण्यात यावा अशी मागणी पेठ विभागातील नागरीक करीत आहे.