विद्यार्थी- पालक- शिक्षक या त्रिकोणातून पाल्याचा विकास साधता येतो – अॕड. रवींद्र कानडे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव आयोजित दहावी विद्यार्थ्यांचा पालक मेळाव्यात मंगलनाथ मल्टिस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी अॕड रवींद्र कानडे बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की, पद, प्रसिद्धी, प्रतिष्ठा व पैसा या सर्व गोष्टी शिक्षणाच्या दर्जेनुसार प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कठोर परिश्रम घेऊन गुणवत्ता विकास साधला पाहिजे यासाठी विद्यार्थी -शिक्षक – पालक हा समभूज त्रिकोण आहे यांच्यातील सुसंवाद हा पाल्याचा विकास साधत असतो म्हणून पालक मेळावा आयोजित केला जातो. तसेच यावेळी प्रति शनिवारी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
या पालक मेळाव्याची सुरुवात सांघिक पद्य व माता सरस्वती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले. या पालक मेळाव्याचे अध्यक्ष केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड, प्रमुख अतिथी रवींद्र कानडे तर व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अॕड विश्वास जोशी, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत भानप, शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक उद्धवराव नागरगोजे तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष लिंबकर सर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक संतोष लिंबकर सर यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखून त्यांच्या कडून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थीनीच्या सुरक्षेसाठी शाळेत विशाखा समिती, परिवार समिती तसेच सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अॕड विश्वास जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळा, पालक आणि समाज हे घटक महत्त्वाचे आहेत असे सांगितले तसेच पालकांनी आपला पाल्य हा आत्मकेंद्रित न होता समाजाभिमुख राष्ट्रभक्त कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. या पालक मेळाव्याचे अध्यक्षीय समारोप करताना प्रकाश दुगड यांनी सांगितले की आपला पाल्य हा सर्वांगीण विकास साधून परिपूर्ण होण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे वारंवार शिक्षकांशी संपर्क करुन संवाद साधला पाहिजे, आपला पाल्य मोबाईल, ऑनलाईन खेळ यापासून दूर राहिला तरच त्याचा मानसिक व शारीरिक विकास होईल. या पालक मेळाव्याचे प्रास्ताविक करताना उपमुख्याध्यापक विठ्ठल काळे सर यांनी सांगितले की, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी प्रथम सत्राखेर अभ्यासाचा वेग वाढवून आगामी काळात होऊ घातलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी करावी. लवकरच विषय तज्ञांचे विषय निहाय विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आयोजित केले जाणार आहे. यावेळी प्रति शनिवारी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पालक मेळाव्याचे बक्षीस वाचन दहावी प्रमुख नरेंद्र कोष्टगावकर यांनी केले, मान्यवरांचे स्वागत परिचय प्रभाकर बनसोडे यांनी करून दिला, सांघिक पद्य चैतन्य आहेर, आभार पर्यवेक्षक रवींद्र खोडवे यांनी मानले, सुत्रसंचलन आदिनाथ कुंडकर यांनी केले. पालक मेळाव्याची सांगता कल्याण मंत्राने झाली. यावेळी सर्व शिक्षक, माता व पिता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.