ताज्या घडामोडी

छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

मतदार याद्या अधिक अचुक व परिपुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल

जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी परभणी

परभणी, (जिमाका), दि.18 :- भारत निवडणूक आयोगाने दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. पुनरिक्षण कार्यक्रम सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सर्व तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावरुन राबविण्याच्या सुचना प्राप्त झाल्या असून छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तरी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचुक व परिपुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.

कार्यक्रमानूसार समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दुर करणे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याद्वारे घरोघरी भेट देवून तपासणी करणे. योग्य प्रकारे विभाग व भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण दि.9 ऑगस्ट ते दि.31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत करण्यात येईल. पुनरिक्षण उपक्रमात एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी सोमवार दि.1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. दावे व हरकती दि.1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्विकारण्यात येतील. विशेष मोहीम दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिवसात होतील. दावे व हरकती दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत निकाली काढण्यात येतील. तर मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी बुधवार दि.5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.

दि.1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून दि.1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना नं.6, नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना नं.8 व त्याच विधानसभा मतदार संघात नाव स्थलांतरीत करण्यासाठी नमुना नं.8-अ मधील दावे आणि मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना नं.7, हरकती सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी तसेच तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातील मतदार मदत कक्षामार्फत स्विकारण्यात येतील. दि.1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार याद्यामध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट नसतील असे मतदार तसेच दि.1 जानेवारी 2022 रोजी ज्यांचे वय 18 वर्ष पुर्ण होत आहे अशा सर्व पात्र नागरिकांनी नाव नोंदणीसाठी विहीत नमुना नं.6 मधील अर्ज सादर करता येणार आहे. मतदार याद्यांतील नाव वगळणीबाबत आक्षेप असतील तर प्रती व्यक्ती पाच या मर्यादेत नमुना नं.7 मध्ये हरकती नोंदविता येतील. सर्व दावे व हरकती दि.1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत बीएलओ, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी तसेच तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातील मतदार मदत कक्षात स्विकारण्यात येतील. छायाचित्र मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या ठिकाणी दोन विशेष मोहिमांचे आयोजन करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या असून महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या विशेष मोहिमांच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ स्वत: हजर राहुन अर्ज व छायाचित्र स्विकारण्याची कार्यवाही करणार आहेत. छायाचित्रासह मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रमासाठी भारत निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त असलेल्या राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक याप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याच्या नेमणूका करुन त्यांची विहीत नमुन्यातील यादी संबंधित बीएलओ, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी तसेच तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असे परभणीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी कळविले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close