ताज्या घडामोडी

गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत अतिरिक्त नवीन मतदान केंद्रांची संख्या वाढवा – सौ. किरण संजय गजपुरे

तळोधी ( बाळापुर ), गांगलवाडी , भिसी , नेरी येथे केंद्राची मागणी

तालुका प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड

गोंडवाना विद्यापीठाच्या पंचवार्षिक सिनेट निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असुन येत्या ॲागस्ट महिन्यात ती पार पडणार आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदार संघातून १० सिनेट सदस्य निवडले जाणार आहेत . या निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधरांची संख्या मागील निवडणूकीच्या तुलनेत दुप्पट झालेली आहे . यामुळे २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीच्या वेळी असलेल्या मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी नागभीडच्या अभाविप कार्यकर्त्या व पदवीधर मतदार सौ. किरण संजय गजपुरे यांनी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. मागील सिनेट निवडणुकीत नागभीड , चिमुर व ब्रम्हपुरी तालुक्यात प्रत्येकी एकच मतदान केंद्र व तेही तालुकास्थानावरच असल्याने मतदारांची केंद्र गाठण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती. त्यावेळी असलेली गोंडवाना विद्यापीठाची नोंदणीकृत मतदारांची संख्या ११ हजारावरुन आता २४ हजारांच्या जवळ गेलेली आहे.
यावेळी ग्रामीण भागातील पदवीधारकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असल्याने येत्या निवडणुकीत मतदारांच्या सोयीसाठी मध्यवर्ती ठिकाणी नवीन मतदान केंद्र निर्माण करणे गरजेचे झाले आहे. नोंदणीकृत मतदारांना येत्या निवडणुकीत मतदान केंद्र १० ते १५ किमी. च्या अंतरात असल्यास सोयीचे होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले केंद्र ही २० ते ३५ किमी. दुर अंतरावरील आहेत . ब्रम्हपुरी तालुक्यांतील काही मतदारांना ५० किमी. अंतरावरुन यावे लागते.
सिनेट मतदारांची होणारी आर्थिक व वेळेची गैरसोय टाळण्यासाठी आता होणाऱ्या सिनेट निवडणुकीत नागभीड तालुक्यात तळोधी ( बाळापुर ) , ब्रम्हपुरी तालुक्यात गांगलवाडी तर चिमुर तालुक्यात भिशी व नेरी अशी अतिरिक्त नवीन मतदान केंद्र तयार करण्याची मागणी नोंदणीकृत मतदारांच्या वतीने अभाविपच्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासनाकडे केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close