झेप प्रभाग संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

कार्यालय ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण उन्नतीकरीता दिशादर्शक ठरावे – जि.प. सदस्य संजय गजपुरे
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड यांच्या मार्गदर्शनातून झेप प्रभाग संघ,पारडी-बाळापूर प्रभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन सुलेझरी येथे या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी झेप प्रभाग संघाच्या सचिव सौ. अनिताताई बावणकर या होत्या. हे कार्यालय ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण उन्नतीकरीता दिशादर्शक ठरावे अशी अपेक्षा याप्रसंगी संजय गजपुरे यांनी व्यक्त करीत उमेद च्या माध्यमातुन सुरु झालेली बचतगटाची ही श्रृंखला ग्रामीण महिलांसाठी आर्थिक प्रगतीचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन केले.
चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वात पहिला प्रभाग संघ म्हणून पारडी- बाळापुर क्षेत्राच्या झेप प्रभाग संघाची नोंद आहे. १६ मार्च २०१८ ला याची रितसर नोंदणी करण्यात आली असुन या प्रभाग संघाच्या मार्गदर्शनात महिलांनी स्वयंरोजगारासाठी अनेक उपक्रम सुरु केलेले आहेत . या प्रभाग संघाअंतर्गत कार्य करणाऱ्या अनेक ग्रामसंघ व बचत गटांना तालुका , जिल्हा , राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
प्रभाग संघाला स्वत:चे कार्यालय नसल्याने होणारी अडचण लक्षात घेऊन सुलेझरी ग्रामपंचायत ची जुनी ईमारत नागभीड नगर परिषदेच्या वतीने झेप प्रभाग संघाला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट जि.प. सदस्य म्हणून सन्मानित झाल्याबद्दल यावेळी प्रभाग संघाच्या वतीने संजय गजपुरे यांचा शाल , श्रीफळ व ग्रामसंघ उत्पादित भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला . उद्घाटन सोहळ्याचे वेळी प्रभागातील २४ ग्राम संघातील पदाधिकारी व कॅडर उपस्थित होते. झेप प्रभाग संघाला नागभीड-ब्रह्मपुरी या राष्ट्रीय महामार्गालगत कार्यालय उपलब्ध झाल्याबाबत सर्वच पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असुन नागभीड नगर परिषदेचे आभार मानले आहे . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून झेप प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ.शशिकलाताई भेंडारकर, नागभीड तालुका उमेद अभियान व्यवस्थापक मोहित नैताम , पत्रकार संघाचे घनश्यामजी नवघडे, यशवंत निकुरे , नितिन बोदेले यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक उमेद चे तालुका व्यवस्थापक अमोल मोडक यांनी केले तर आभार प्रभाग समन्वयिका कु.ज्योती साळवे, यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शुभम देशमुख, गजानन गोहणे, दिपक गायकवाड स्वप्निल गिरडकर, नंदकिशोर डहारे, इंद्रजीत टेकाम, किशोर मेश्राम, प्रभागातील प्रभागसंघ पदाधिकारी, ग्रामसंघ पदाधिकारी व प्रभागातील कॅडर यांनी मेहनत घेतली.