साई जन्मस्थान मंदिरात आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्रीगुरुपौर्णिमा उत्सवास काल दिनांक 12 जुलै 2022 रोजी प्रारंभ झाला असून, आज या कार्यक्रमाचा मुख्य दिवस आहे.
आज मुख्य दिवशी पहाटे पाच वाजता प.पू. श्रीसाईबाबांचे कुलदैवत पंचबावडी हनुमान मंदिर येथे श्री संजय भुसारी, विश्वस्त यांचे हस्ते महा अभिषेक झाला. पहाटे साडेपाच वाजता श्रीसाईबाबांची काकड आरती नंतर श्रींचे मंगल स्नान झाले.
आज प.पू.श्रीसाईबाबा नंतर श्री संजय भुसारी विश्वस्त यांनी द्वारकामाई मध्ये श्री साई सच्चरित्र ग्रंथाचा शेवटच्या अध्यायाचे पारायण करून द्वारकामाईतून श्री साई मंदिरात श्रीसाई चरित्र ग्रंथाची, व बाबांचा प्रतिमेची टाळमृदंगाच्या गजरात मिरवणूक निघाली, या मिरवणुकीत श्री संजय भुसारी, विश्वस्त यांनी श्रींची पोथी घेतली, आर्किटेक्ट श्री सुभाष दळी, विश्वस्त यांनी प.पू.श्रीसाईबाबांची प्रतिमा घेतली, श्री सूर्यभान सांगडे, विश्वस्त यांनी विणा घेतली. या या मिरवणुकीत परम साई भक्त श्री राजेंद्रजी कुलकर्णी, सौ सविता कुलकर्णी, सौ सरोज ताई कच्छवे, सीमा कनोजिया दिल्ली व इतर साई भक्तांनी सहभाग घेतला होता.
उत्सवाचे मुख्य दिवशी श्री संजय भुसारी यांचे हस्ते साईबाबांची पाद्य पूजा करण्यात आली व प.पू.श्रीसाईबाबांना महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सर्व विश्वस्त महोदयांच्या हस्ते धुनी पूजा झाली. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत श्री ह भ प भालचंद्र सरदेशपांडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले दुपारी साडेबारा वाजता श्रींची महाआरती व नंतर परम साई भक्त श्री गजानन यादव औरंगाबाद यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून परम साई भक्त सौ सरोज ताई कच्छवे यांनी श्री साई स्मारक समितीस रु.25000/- ची ऑनलाइन देणगी केली तसेच परभणी येथील परम साई भक्त श्री नागेंद्र व्यंकय्या अनंतवार यांनी श्री साई स्मारक समितीस एक किलो चांदीची सुरेख अशी साईबाबांची मूर्ती देणगी दाखल दिली. तसेच मंदिर प्रमुख सौच.छायाताई कुलकर्णी यांनी रु.37000/- किमतीचा एसी समितीस देणगी दिला.
सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी राम रक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र व नंतर धुपारती होईल, सायंकाळी सात वाजता श्रींची पालखी निघेल. सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत प्रसिद्ध गायक श्री ओंकार संसारे यांची भजन संध्या होईल. रात्री नऊ वाजता शेजारती होईल.
अशी माहिती समितीचे विश्वस्त आर्किटेक श्री सुभाष दळी यांनी दिली.