बाळूमामाच्या शोभायात्रेने वेधले गंगाखेडवासीयांचे लक्ष
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बाळूमामाच्या पालखीची गंगाखेड शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या पालखीचे यात्रा मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
बाळूमामाच्या मेंढ्या मागील आठ दिवसापासून संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात थांबलेल्या होत्या. पालखी व मेंढ्यांच्या दर्शनासाठी गंगाखेड शहर व परिसरातील दररोज हजारो भाविकांनी गर्दी केली होती .सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या महाआरतीने गर्दीचे रेकॉर्ड तोडले गेले. दिवसभर महाप्रसाद सुरू होता. दररोज वेगवेगळ्या भक्तांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. महाप्रसादाची व्यवस्था करणाऱ्या भाविकांना आरतीचा मान मिळत असे. बुधवारी शहरातून मोठा मारुती मंदिर ,संत जनाबाई मंदिर, बालाजी मंदिर, टोले गल्ली , समर्थ किराणा ,मराठा मंदिर ,पोस्ट ऑफिस, श्रीराम चौक व परत मोठा मंदिर मार्गे पालखी चे ठिकाणी रवाना झाली. या शोभायात्रा मार्गावर ठीकठिकाणी पालखीची महाआरती करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी घोडा व गडावर कुत्रा याचे पूजनही भाविक भक्तांनी केले. रस्त्यात भाविकांनी पालखी मध्ये सहभागी असलेल्या भक्तांसाठी लिंबू पाणी ,थंड पेय आदींची व्यवस्था केली होती .शोभायात्रा भगवती चौकात आल्यानंतर या पालखीचे प्रमुख कारभारी यशवंत सुरनर व शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी धडपड करणारे सखाराम बोबडे पडेगावकर, उद्धव शिंदे, नारायणराव धनवटे , विक्रम इमडे आदींचाही फेटे बांधून सत्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी वाजत गाजत ही पालखी मुळी कडे रवाना झाली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पालखीच्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी नगरपालिकेने पिण्याचे पाणी, रस्त्यावर पाणी मारणे, स्वच्छता ठेवणे ,रस्त्यावर बल्प बसवणे आदी सेवा पुरविल्या बद्दल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्वाती गणेश भोकरे मॅडम यांचा सपतिक सत्कार करण्यात आला.