वाचकप्रिय व रसिकमान्य मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
माजी राष्ट्रपती व प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ व वाचन प्रेरणा दिनानिमित्त शनिवार दि.15 आक्टोबर, 2022 रोजी आनंद निकेतन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ‘वाचकप्रिय व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मराठी पुस्तके’ यावर एका अभिनव ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यास विद्यार्थी तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंदाने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. वाचकांच्या सोयीसाठी ग्रंथप्रदर्शनी सोमवारी दि. 17 आक्टोबर रोजीही सुरू राहील.
याप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ ग्रंथालय कर्मचारी श्री हरिभाऊ खुडसंगे यांचे शुभहस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. वाचनकक्षात झालेल्या या कार्यक्रमास ग्रंथपाल डॉ. संजय साबळे व सहकारी ग्रंथालय कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथप्रदर्शनात प्रामुख्याने मराठीतील वाचकप्रिय व रसिकमान्य निवडक पुस्तकांचा समावेश करण्यात आला. गेल्या दशकातीलच नव्हे तर गेल्या 50 – 60 वर्षांपासून मराठी वाचकांनी ज्या पुस्तकांवर नितांत प्रेम केले अशा रसिकप्रिय पुस्तकांना विशेष प्रदर्शित करण्यात आले. वाचकांच्या मनावर कायम गारुड असलेल्या साने गुरुजींच्या ‘शामची आई ‘ या कादंबरी पासून ते अच्युत गोडबोले यांच्या
‘मुसाफिर’ या आत्मकथनापर्यंत विविध वाड्ःमय प्रकारातील प्रसिध्द पुस्तकांचा अंतर्भाव प्रस्तुत प्रदर्शनीत करण्यात आला. ‘एका लेखकाचे एक पुस्तक’ या आधारावर निवडक लेखकांच्या कलाकृतींची निवड करण्यात आली.
या ग्रंथप्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल डॉ.संजय साबळे, ग्रंथालय कर्मचारी भुपेश साखरे, हरिभाऊ खुडसंगे, सुनिल चिमुरकर, सुमित शिर्के, अर्चना चव्हाण, मैनाबाई मगरे, प्रफुल्ल थुटे तसेच अविनाश मोपकर यांनी परिश्रम घेतले.