ताज्या घडामोडी

कोर्धा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

आपण ज्या मातीत जन्म घेतला , तेथील मातेला , मातीला आणि मातृभुमीला अभिमान वाटावा असे अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा शिवछत्रपतींनी दिली आहे . साडेतीनशे वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादाने आणि शहाजी महाराजांच्या पाठींब्याने वास्तवात आणुन दाखवत शुन्यातुन स्वराज्य निर्माण करण्याचा मोठा आदर्श युवकांसमोर ठेवला असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी कोर्धा येथील शिवजयंती उत्सवात केले.
नागभिड तालुक्यातील कोर्धा येथे युवा फ्रेंड्स सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा मंडळ व युवा संघटना कोर्धा यांच्या वतीने शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे , पं. स. सदस्य संतोष रडके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोर्धा येथील सरपंच सौ. पुष्पाताई चौधरी या होत्या. याप्रसंगी कोर्धा चे उपसरपंच दिनेश चौधरी , गुरुदेव सहकारी राईस मिल चे अध्यक्ष बंडुभाऊ खेवले , सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अरुण गायधने , पोलीस पाटील आनंदराव जिवतोडे , तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरीदास नवघडे , ज्येष्ठ नागरीक वासुदेव जिवतोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती .
या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची न्यायव्यवस्था या विषयावर आचार्य पदवी प्राप्त कोर्धा येथील रहिवासी डॅा. हरिदास वाकुडकर यांनी शिवकालीन व सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेवर मोलाचे मार्गदर्शन केले. जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलतांना त्यांच्या जीवन कार्यशैलीची माहिती दिली तसेच जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे राबवित येत असलेल्या मिशन गरुडझेप अंतर्गत कोर्धा येथे सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका देण्याची घोषणा केली. यामुळे गावातील शैक्षणिक क्षेत्रात खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी पं.स. सदस्य संतोष रडके यांनीही छत्रपतींच्या जीवनकार्याचा गौरव करीत त्यांच्या आदर्शावर युवकांनी मार्गक्रमण करावे असे सांगितले .
यावेळी जि.प.सदस्य यांच्या वतीने वृध्दांना बांबुकाठीचे वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर मशाखेत्री यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ खेवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील सर्व युवकांनी पुढाकार घेतला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close