आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची शक्ती कायद्याच्या निमंत्रित सदस्यपदी निवड
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा-सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 यावरील दोन्ही सभागृहाची संयुक्त समितीच्या निमंत्रित सदस्य पदी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती 27 जानेवारी 2022 रोजी उपसचिव महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय शिवदर्शन साठे यांनी केली आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा यासाठी सर्वप्रथम मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनीच केली होती. त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा कायदा समजून घेण्यासाठी आंध्र प्रदेशचा दौरा केला. त्यानुसार आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू होणार आहे. याची दखल घेत विधान भवनाच्या विधानपरिषद व विधानसभेचे दोन्ही सभागृहाने गठीत केलेल्या समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची निमंत्रीत सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहे.