परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमणघाण पाण्यामुळे संताप

कंपाऊंड वॉल तोडून कचरा टाकल्याचा आरोप
कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील परीट (धोबी) समाजाच्या स्मशानभूमीतील कंपाऊंड वॉल तोडून अतिक्रमण करण्यात येत असून, त्याठिकाणी कचरा टाकण्यासह नालीचे घाण पाणी सोडले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाचे परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण बालाजी टोके यांनी केला आहे. या प्रकारामुळे समाजाच्या अंत्यविधीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत उपजिल्हाधिकारी, पाथरी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नारायण टोके यांनी नमूद केले आहे की, परीट समाजाच्या स्मशानभूमीभोवती संरक्षणासाठी कंपाऊंड वॉल बांधण्यात आलेली आहे. मात्र, जवळील काही लोकांनी सदर कंपाऊंड वॉल तोडून टाकल्याचे तसेच स्मशानभूमीच्या परिसरात नालीचे घाण पाणी सोडले जात असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या समाजबांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र ठिकाणी कचरा व सांडपाणी सोडणे ही समाजाच्या भावनांची विटंबना असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने पाहणी करून स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवावे, तुटलेली कंपाऊंड वॉल दुरुस्त करावी, नालीचे घाण पाणी स्मशानभूमीत येणार नाही याची व्यवस्था करावी तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या समस्येवर तातडीने कार्यवाही न झाल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून जाहीर निषेध करण्यात येईल, असा इशाराही नारायण बालाजीराव टोके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची प्रत पाथरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.
आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन स्मशानभूमीची पाहणी करून संबंधित समस्यांवर कोणती कार्यवाही करते, याकडे परीट समाजाचे लक्ष लागले आहे.









