गंगाखेड रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम तात्काळ करा अन्यथा अमरण उपोषण करणार – आ.गुट्टे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गंगाखेड रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या १३ वर्षापासून आज पर्यंत अपूर्णच असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे फाटकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो अपघात होऊन अनेकांनी आपला जीव सुद्धा गमावला आहे. वेळोवेळी बंद रेल्वे फाटकामुळे अनेक गरोदर महिलांची तेथेच प्रस्तुती झाली असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
गंगाखेड रेल्वे उड्डाण पुलाचे काम तात्काळ पूर्ण करून पूल रहदारीस मोकळा करून देण्यात यावा या मागणीसाठी आमदार गुट्टे हे १२ एप्रिल २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण बसले असता ३१ मे २०२१ अखेरपर्यंत सदरील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लेखी आश्वासन दिले. परंतु आज पर्यंत सदरील उड्डाणपुलाचे काम अपूर्णच आहे. उड्डाणपुलाच्या अपुऱ्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांची होत असलेल्या गैरसोय बाबत आमदार गुट्टे यांनी राज्य शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतू राज्य सरकार आणि सदरील कॉन्ट्रॅक्टरला जाग आली नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय थांबावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार गुट्टे यांनी वडील मयत झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी याकरिता उड्डाणपुलाचे उर्वरित काम करण्याकरिता २४.८० लक्ष रुपयाचा धनादेश मा.जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग परभणी यांच्याकडे दिला.
उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने यावर्षी पावसाळ्यात लहान-मोठे शंभरपेक्षा अधिक अपघात झाले असून त्यातील तीन ते चार गंभीर अपघातग्रस्त नांदेड येथे उपचार घेत आहेत. उडान पुलावरून प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुलावरील डांबरीकरणाचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे असे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना दिलेल्या पत्रात म्हटले.
जिल्हाधिकारी परभणी यांनी यापूर्वी मला लेखी आश्वासन दिले होते त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेण्यात यावी. सदरील उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचे काम करण्यास केवळ पंचवीस लक्ष रुपयांची गरज असून मी दिलेल्या धनादेशातून सदरील डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरू करून रस्ता नागरिकांना प्रवासायोग्य करून देण्यात यावा अन्यथा २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वा.पासून मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी म्हटले आहे.
जि.प.सदस्य किशनराव भोसले, राजेश फड, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, रवी कांबळे, तायर खा पठाण यांच्या उपस्थितीत मा.निवासी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले.