ताज्या घडामोडी

सर्वांगीण विकासासाठी भारतीय विचार हेच अंतिम सत्य-सुनील लोढा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव-श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा पदस्पर्श श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलास झाला आहे. त्यामुळेच या संकुलाची आजची ही प्रगती आहे. स्वत:पूरता संकुचित विचार न करता सर्वांचा विकास व्हावा यासाठी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, समरसता मंच यासारख्या सामाजिक संघटना च्या माध्यमातून अविरत कार्य केले. राष्ट्रीय विकासासाठी भारतीय चिंतन हे अंतिम सत्य आहे . असे प्रतिपादन श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा यांनी केले. ते श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलामध्ये श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेचे अनावरण व सभागृह नामकरण सोहळा या निमित्ताने व्याख्यानांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भा.शि.प्र. संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्यामजी लोहिया अभाविप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साठे संस्थेचे सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, डॉ. हेमंत वैद्य, श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुनील लोढा म्हणाले की स्वयंसेवक म्हणून कामांमध्ये स्वानुभूती व सामाजिक भाव असावा. दत्तोपंतजी ठेंगडी हे दोन वेळा राज्यसभेत खासदार होते. राजकारणात जरी असले तरी त्यांचा राष्ट्रकारणांमध्ये अधिक रस होता.श्रद्धेय दत्तोपंतजी यांच्या विविध विचाराचे पैलू सांगून, त्यांच्यामुळे आज आपली आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरनाथ खुर्पे यांनी करताना सांगितले की श्रद्धेय.दत्तोपंतजी ठेंगडी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलांमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले असून १९८९ मध्ये श्री सिद्धेश्वर विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या हस्ते झाले ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या प्रेरणेतून श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल सामाजिक बांधिलकीतून काम करत आहे श्रद्धेय दत्तोपंतजी यांचा पदस्पर्श झालेल्या या पावन भूमीत आपल्याला सेवा करण्याचे परम भाग्य लाभले आहे. *या कार्यक्रमात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे यांना आदर्श संस्थाचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा हृद्य सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मनोगतात प्रा. चंद्रकांत मुळे यांनी संघ,संस्था शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला. संस्थेतील सर्व शिक्षक आदर्श आहेत तुमच्या मुळेच मला पुरस्कार मिळाला असे त्यांनी गौरवोद्गार काढले.या प्रसंगी अभावीप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे यांनीही मनोगतात म्हटले की शिक्षण आणि सामाजिकता जपणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्य प्रशंसनीय आहे. अध्यक्षीय समारोपात भाशिप्र संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया म्हणाले की श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांनी आपले आयुष्य राष्ट्राला समर्पित केले होते. कार्यकर्त्यांच्या विश्वासावर हा जगन्नाथाचा रथ चालत आहे. सूत्रसंचालन प्रा डॉ. रमेश गटकळ, प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर तर आभार मुख्याध्यापक बाबुराव आडे यांनी केले. पद्य प्रा. अंकुश साबळे, चैतन्य आहेर यांनी सादर केले.समरसता मंत्र उपप्राचार्य डॉ.गजानन होन्ना यांनी सांगितला. या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी अभय कोकड, विश्वास जोशी, तेजस महाजन, जगदीश साखरे प्राचार्य डॉ.महेश देशमुख, मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी ,प्रदीप जोशी ,सौ वंदना मिटकरी यांच्यासह स्थानिक संस्था सभासद पत्रकार प्राध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close