सुरजागड प्रकल्पात स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना संधी
त्रिवेणी कंपनीच्या भूमिकेला एटपल्ली तालुका शिवसेनेचा विरोध
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पाला आदिवासींचा व स्थानिकांचा विरोध असतांना सुद्धा अनेक कायद्यांचे उल्लंघन करत या प्रकल्पाचे काम काही प्रमाणात सुरू झाले आहे. हा प्रकल्प प्रस्तावित करत असतानाच रोजगारात व इतर बाबींमध्ये स्थानिकांना व प्रामुख्याने आदिवासी समाजाला प्राधान्य देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु असे होतानाचे चित्र दिसत नाही.
उच्च शिक्षित स्थानिक बेरोजगार आवश्यक असलेल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा त्यांना अनेक महिने थांबवून ठेऊन नंतर परस्पर इतर जिल्ह्यातील, राज्यातील लोकांना संधी कंपनीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिकांमध्ये असंतोषाचे व रोषाचे वातावरण निर्माण होत आहे. रोजगार निर्मिती हाच उद्देश सांगून तत्कालीन सरकार व कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला परंतु जर यात स्थानिकांना कुठलेच स्थान न देता परस्पर त्यांची संधी नाकारली जात असेल तर हे फार अन्यायकारक आहे.
या गंभीर विषयावर लक्ष न घालता जर स्थानिकांना डावलून इतरांना संधी देण्याचे सत्र सुरू राहणार असेल तर तालुक्यातील व जिल्ह्याभरातील बेरोजगार युवक युवतींना एकत्रित करून मोठे जनआंदोलन उभे करू आवाहन एटापल्ली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन स्थानिकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा करावा या साठी शिवसेनेकडून कंपनीच्या मनमानी भूमिकेला विरोध करण्यात आला. या प्रसंगी अरुण दुर्वे (उपजिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा),राजगोपाल सुल्वावार (नियोजन समिती सदस्य), मनीष दुर्गे (एटापल्ली तालुका प्रमुख), दिलीप सुरपम (युवा सेना) व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.