ताज्या घडामोडी

धान खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी लावली चप्पलांची रांग

देसाईगंज तालुक्यातील कार्यालयात शेतकऱ्यांची उडाली झुंबड.

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

गडचिरोली- खरिप धान खरेदी करण्याकरिता पुर्वतयारी म्हणून शेतकऱ्यांचे सातबारे व अर्ज आॕनलाईन नोंदणी करण्याचा श्रीगणेशा बुधवार पासुन होणार आहे. फेडरेशनच्या या निर्णयाने शेतकरी पार गोंधळून गेला असून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी विक्री कार्यालयासमोरच आपलाच पहिला नंबर लागावा म्हणून एका दिवसापुर्वीच चक्क चप्पलांची लांबच लांब रांग तयार केली आहे.कधी नव्हे ते यंदा जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली यांच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत कमालीचा बदल झालेला दिसतोय.धानपीक रास घरी येण्या करिता महिना-दीड महिना शिल्लक असतांना सुध्दा फेडरेशनला जाग आलेली दिसते. एकीकडे त्यातच ई-पीक पाहणी मोबाईल अप्लीकेशनवर ऑनलाईन माहिती अपलोड करण्याची घाई सुरू असतांना आता आधारभूत धान खरेदी केंद्रावर चालू खरिपाच्या हंगामातील धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी अर्ज, सातबारे देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करिता जमा करण्याचे आवाहन देसाईगंज खरेदी विक्रीच्या संस्थेच्या वतिने नुकतेच करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने तालुक्यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन वा तलाठी कार्यालयातून प्रचंड धावपळ करून सातबारे, नमुना आठ काढण्यासाठी गर्दी केली आहे.अर्ज आणि कागतपत्रे सोबत घेऊन शेतकरी बांधव मोठ्या संख्येने देसाईगंज येथील लाखांदूर कार्यालयासमोर जमा होऊन नंबर लावण्यासाठी स्वतः उभे राहण्याच्या जागी आपल्या पायातील चप्पल जोड जमिनीवर मांडले आहेत. त्यामुळे चप्पलांची लांबच लांब रांग तयार झाली आहे. उन्हाळ्यात तर कोरेगाव येथील केंद्रावर शेतकऱ्यांनी चक्क रात्रभर मुक्काम केला होता. आजही शेतकरी रात्रभर जागून काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close