ताज्या घडामोडी

भिसी बसस्थानकाच्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

भिसीवासीयांचे स्वप्न साकार होईल

आमदार भांगडीया यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमूर

भिसीवासी गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानक बांधण्याची मागणी करत आहेत. बस स्थानकासाठी प्रस्तावित जागा वन विभागाची असल्याने मंजुरीचे काम शिल्लक राहिले होते. आमदार भांगडीया यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे प्रस्तावित जागेच्या अंतिम मंजुरीसाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्याला मंजुरी मिळाली आहे. आता भिसीवासीयांचे मागील अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
चिमूर तहसीलचे सर्वात मोठे गाव भिसीची लोकसंख्या 20 हजारांच्या पुढे आहे. आसपासच्या चाळीस ते पन्नास गावांचा भिसीशी थेट संपर्क आहे. दररोज भिसी येथून बिस ते बावीस एसटी बस ये-जा करतात. येथे प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था नसल्याने भिसी बस स्थानक संघर्ष समितीचे अध्यक्ष उमेश बोमेवार यांनी 2013 मध्ये चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना विठ्ठल मंदिरासमोर बस स्थानक बनवण्याच्या संदर्भात निवेदन दिले होते. पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. 2014 मध्ये कीर्तिकुमार भांगडिया आमदार झाले आणि भिसी बस स्थानक संघर्ष समितीने त्यांना बसस्थानकासंदर्भात निवेदनही दिले. बसस्थानक बनवण्याच्या प्रस्तावित जागा वनविभागाची असल्यामुळे त्यात अनेक अडथळे येत होते. परंतु आमदार भांगडीया यांनी सातत्याने प्रयत्न करून वन विभागाची जमीन हस्तांतरित करण्यात यश मिळवले आणि त्या जागेच्या अंतिम मंजुरीसाठी सदर प्रस्ताव चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आला. 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या आदेशात भिसी बसस्थानकाच्या जागेला मंजुरी देण्यात आली.
भिसी गाव सर्व्हे नं. 374 मध्ये 0.95 हेक्टरवर बसस्थानकाच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागभीड कार्यालयाने प्रस्तावित जागेचे सीमांकन करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात 12 हजार रुपये भरून नोव्हेंबर 2019 मध्ये जागेचे सीमांकन करण्यात आले. वरील जागा मिळवण्यासाठी नागभीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र सरकारला 10 लाख सात हजार दहा रुपये दिले होते. त्यानंतर जानेवारी 2020 रोजी डीडीद्वारे 19150 रुपये दिले गेले.
1 कोटी 598 रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या भिसी बस स्टँडच्या बांधकामासाठी, ग्रामपंचायतीची एनओसी, ग्राम वन हक्क समितीची मान्यता, ग्रामसभेचा प्रस्ताव, पटवारीचा अहवाल, उपविभागीय वन हक्क समिती (FRA CRTIFICAT) इत्यादीचा अहवाल व नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते.
सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना 10 ऑगस्ट 2021 रोजी सर्व कागदपत्रांसह बस स्टँड बांधण्यासाठी अंतिम मंजुरीसाठी देण्यात आला होता. 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबंधित विभागाला बसस्थानकाची जागा मंजूर करण्यात आल्याचे प्रमाणपत्र दिले. संबंधीत विभाग पुढील कारवाई करून बस स्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करणार असल्याची माहीती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close