भिसी मध्ये अंधश्रद्धेवर जनजागृती कार्यक्रम

भिसी पोलीस विभागाचा उपक्रम
तालूका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात घडलेल्या अंधश्रद्धेच्या घटनांमुळे सामान्य जनता हादरली आहे. एकीकडे अशा घटनांमुळे निरपराध लोकांवरील अन्यायाच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे पोलीस विभागाची डोकेदुखीही वाढली आहे. भिसी पोलीस विभाग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे भीसी पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील पोलीस पाटलांना अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती देण्यासाठी व त्यावर आळा घालण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमोद गौरकर यांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. गौरकर यांनी समाजात पसरलेल्या विविध अंधश्रद्धांविषयी सविस्तर माहिती दिली आणि त्यावर उपाय योजनाही सांगितली. समितीचे चिमूर तहसील संघटक सारंग भीमटे यांनी विविध प्रयोग सादर करून व अनेक उदाहरने देऊन मार्गदर्शन केले. स.पो.नि. प्रकाश राऊत यांनीही उपस्थितांना अंधश्रद्धेच्या बाबतीत पोलिसांच्या भूमिकेची माहिती दिली.
भिसी पोलीस स्टेशन द्वारा आयोजित कार्यक्रमात स. पो. नि.प्रकाश राऊत, अभा अनीस चे जिल्हा कार्यकारीनी सदस्य पंकज मिश्रा, सहाय्यक. उपनिरीक्षक सचिन जंगम, भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत गावाचे पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, गणेश मंडळाचे सदस्य, होमगार्ड उपस्थित होते.