समाजकल्याण विभाग व जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने दिव्यांगांना स्वावलंबन स्मार्ट कार्ड चे वाटप
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना धनादेश वाटप व दिव्यांगांना स्वावलंबन स्मार्ट कार्ड चे वाटप कार्यक्रम नागभीड येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागभीड पंचायत समितीच्या उपसभापती सौ.रागिणीताई गुरपुडे या होत्या.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य संजय गजपुरे व सौ.नैनाताई गेडाम , पं.स.सदस्य संतोष रडके व शामसुंदर पुरकाम , संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी यांची उपस्थिती होती. दरवर्षी हा कार्यक्रम जिल्हास्तरावर घेण्यात येत होता पण समाजकल्याण .स.सभापती नागराज गेडाम यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीला मान देत प्रत्येक तालुक्यात लाभार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी या प्रसंगी दिली व नवविवाहित आंतरजातीय जोडप्यांचे स्वागत करीत दिव्यांगांच्या विविध योजनांची माहिती दिली. पं.स.उपसभापती सौ.रागिणीताई गुरपुडे यांनी विना कुरबुरीसह उत्तम संसार करीत दोन्ही कुटुंबासमोर आदर्श निर्माण करण्याचा सल्ला नवविवाहित जोडप्यांना दिला.याप्रसंगी उपस्थित अतिथींनिही समयोचित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात नागभीड तालुक्यातील आंतरजातीय विवाहित २२ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ६९ दिव्यांगांना स्मार्ट कार्डचे वितरण अतिथींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे विशेष शिक्षक अजय वैरागडे यांनी केले . संचालन पं.स.चे विस्तार अधिकारी रामचंद्र धुर्वे यांनी तर आभार हिरा गजभिये यांनी केले. लाभार्थ्यांची नोंदणी , व्यवस्था व स्वागत विस्तार अधिकारी श्वेता राऊत मॅडम व समाजकल्याण निरीक्षक पांडुरंग लोनकर यांनी केले.