ताज्या घडामोडी

मौशी येथे हत्तीरोग कीटचे वाटप

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात सर्वत्र सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका तीन प्रकारच्या प्रतिबंधात्मक औषधी गोळ्यांचे वाटप करीत आहेत. याच मोहिमेतील पुढील टप्पा म्हणून प्रत्यक्ष हत्तीरोग असलेल्या रुग्णांना हत्तीरोग कीटचे वाटप करण्यात येत आहे.
नागभीड तालुक्यातील मौशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प.सदस्य व रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष संजय गजपुरे यांच्या हस्ते रुग्णांना हत्तीरोग कीटचे वाटप करण्यात आले. मौशी केंद्राअंतर्गत सध्या ३३८ हत्तीरोग रुग्णांची नोंद असुन या सर्वांना कीटचा लाभ मिळणार आहे. सुरुवातीला या कीटचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थितांसमोर करून दाखविले.
हत्तीरोग निर्मुलनासाठी अजूनही अधिक कार्य करण्याची गरज असल्याचे मत संजय गजपुरे यांनी व्यक्त करीत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासभोवतील परीसर स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. विशेषतः पाय विद्रुप करणाऱ्या या रोगाचे उच्चाटन प्रतिबंधात्मक औषधी गोळ्यांमुळे शक्य असल्याचीही माहिती दिली. या समारंभाला मौशीच्या सरपंच सौ.संगिताताई करकाडे , माजी सरपंच वामनराव तलमले , ग्रा.पं.सदस्य अरविंद भुते व विकास मानापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर माकडे यांनी केले . संचालन आरोग्य सहाय्यक एम.झेड.मडावी यांनी केले तर आभार आरोग्य सहाय्यक जे.ए.शिंगाडे यांनी मानले. यावेळी स्थानिक रुग्णांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close