पाथरीच्या साईबाबा मंदिरात जिल्हाधकारी आंचल गोयल यांनी घेतला आढावा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवारी पाथरी दौरा करून विविध कामांचा आढावा घेतला. शहरातील साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी आरती केली.
यानंतर जिल्हाधकाऱ्यांनी मंदिर समितीचे मुकुंद चौधरी, उपजिल्हाधिकारी दर्शन निकाळजे, नगरपालिका मुख्याधिकारी सोनवणे, पाथरीचे प्रभारी तहसीलदार सुभाष बालचंद कट्टे यांच्यासमवेत बैठक घेतली.
जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गोयल ह्या बुधवारी पाथरीला प्रथमच आल्या. शासकीय कार्यालयांना भेटीगाठी आणि पाहणी दौरा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
जिल्हाधिकारी गोयल यांनी तहसील कार्यालयाची तसेच ग्रामीण रूग्णालयात जावून पाहणी केली. प्रत्येक टेबलावर जाऊन त्यांनी चौकशी केली. तहसील कार्यालय स्वच्छ ठेवा, आपण जसे घरांमध्ये राहतो त्या पद्धतीनेच या ठिकाणी जास्तीत जास्त काम करा अशा सूचना त्यांनी दिल्या. अनेक बाबी त्यांना खटकल्या, त्यावर सूचनाही केल्या. पाथरी येथे त्यांनी अनेक कार्यालयाची पाहणी केली. नगरपालिका कार्यालय येथे त्या पोहचल्या. रेकॉर्ड रुमची देखील त्यांनी पाहणी केली.
काही कामांमध्ये सुधारणा करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रत्येक बाब त्यांनी निदर्शनास आल्यानंतर काही सूचना दिल्या आहेत.
पाथरी शहरातील विविध प्रश्नांच्या संदर्भात त्या काय भूमिका घेतात व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसापासून कार्यालयीन कामकाजाची वेळ सांभाळत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत.