पारधी समाजाला विनाअट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व घराचे पट्टे द्या

उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा
रानावनात राहून वन्य प्राण्यांची शिकार करणे व आपला उदरनिर्वाह करणाऱ्या व वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या तसेच शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या पारधी समाजाला अनुसूचित जमाती (आदीवासी) मध्ये असून सुद्धा 1950 चा जातीच्या पुराव्याअभावी जातीचे प्रमाणपत्र पारधी लोकांना मिळत नसल्याने शासकीय योजनेचा लाभ व शैक्षणिक कामे खोळंबली होती म्हणूनच उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्यासोबत चर्चा करून जातीचे प्रमाणपत्र व राहत्या घराच्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले.
निवेदन देताक्षणी उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी लगेचच शासकीय यंत्रणेला कामी लावली असून उद्यापासून पारधी समाजातील लोकांना विनाअट जातीचे प्रमाणपत्र देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. येत्या डिसेंबर अखेर भद्रावती -वरोरा तालुक्यातील पारधी समाज राहत असलेल्या घराचे मालकी हक्काचे पट्टे व पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी सोबत चर्चा करून प्रधानमंत्री घरकुल योजनेचा सदर समाजाला लाभ देण्यात येईल असेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी चर्चेमध्ये सांगितले. निवेदन देताना आदिवासी पारधी विकास परिषद येते दिला अध्यक्ष धर्मेंद्र अंकुश शेरकुरे, वरोरा तालुका अध्यक्ष दिवाकर श्रीकृष्ण ननावरे, मारुती लक्ष्मण शेरकुरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.