जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पाथरीत महामार्ग रोखला

मराठा आंदोलकांचा जोरदार एल्गार
हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासह विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी; रास्ता रोकोमुळे महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पाथरी शहरात बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देणे व त्यास वैधता देणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील प्रलंबित व्याज परतावे तातडीने अदा करणे, तसेच पंजाबराव देशमुख विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना तातडीने देणे आदी मागण्यांचा समावेश होता.
रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. शासनाने आता केवळ आश्वासने न देता प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
दरम्यान, आंदोलकांच्या वतीने पोलिस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी पाथरी शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, रास्ता रोकोदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.









