अड्याळ टेकडी प्रकरणात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाला आणखी मोठा दिलासा; धर्मादाय विभागाचाही निर्णय संस्थेच्या बाजूने

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
अड्याळ टेकडी येथील श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू-वैकुंठ प्रकरणात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या बाजूने आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यापूर्वी महसूल विभागातील विविध आदेशांमध्ये तसेच अप्पर जिल्हाधिकारी, चिमूर यांनी दिलेल्या सविस्तर निर्णयात अड्याळ टेकडीवरील संबंधित जमीन व भू-वैकुंठ प्रयोगाचा इतिहास, महसुली नोंदी आणि शासन निर्णयांचा आधार घेत संस्थेची भूमिका मान्य करण्यात आली होती.

आता उप धर्मादाय आयुक्त, अमरावती यांनी बदल अहवाल चौकशी क्र. ४९२/२०२२ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार संबंधित स्थावर मालमत्तेची नोंद अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या अनुसूची–१ (Schedule-I) मध्ये घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सुबोध रमेश बोकडे व नवलाजी हरीजी मुळे यांनी केलेले हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावण्यात आले असून बदल अहवाल मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे, महसुली नोंदी व पुराव्यांच्या आधारे हा बदल कायदेशीर व वैध असल्याचे नमूद केले आहे.
यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी, चिमूर यांनीही उपलब्ध महसुली अभिलेख, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, शासन आदेश आणि इतर कागदपत्रांचा विचार करून संस्थेच्या बाजूने निर्णय दिला होता. तसेच संबंधित हस्तक्षेपकर्त्यांचा कायदेशीर हितसंबंध (Locus Standi) सिद्ध झालेला नसल्याचे निरीक्षणही आदेशात नोंदविण्यात आले होते.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सलग महसूल व धर्मादाय विभागातील निर्णयांमुळे अड्याळ टेकडीवरील भू-वैकुंठ प्रयोग, त्याचा इतिहास आणि संस्थेचा कायदेशीर दावा अधिक बळकट झाला आहे. तसेच समाजाने कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित दाव्यांवर विश्वास न ठेवता अधिकृत महसुली अभिलेख, शासन आदेश आणि न्यायालयीन निर्णय यांच्यावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
संस्थेने असेही म्हटले आहे की, काही व्यक्ती न्यायालयीन लढाई सुरू असल्याचा दावा करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र या प्रकरणातील अधिकृत आदेश उपलब्ध असल्याने नागरिकांनी कोणतीही आर्थिक देणगी किंवा सहकार्य करण्यापूर्वी संबंधित व्यक्तींच्या दाव्यांची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









