ताज्या घडामोडी

जलजीवन मिशनचा कोट्यवधींचा डोलारा ठप्प

!चार कोटींची योजना धूळ खात.

रेणाखळीकरांच्या घशाला अजूनही कोरडपाथरी.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शासनाच्या “हर घर जल” घोषणेचा गाजावाजा सुरू असताना पाथरी तालुक्यातील रेणाखळी गावातील नागरिक आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण झाल्याचे कागदावर दिसत असले, तरी गावकऱ्यांच्या नळाला पाणीच नसल्याने संपूर्ण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या रेणाखळी गावाला २०१५-१६ च्या दुष्काळात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यावेळी शासनाने सुमारे ७० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली; मात्र ती योजना अर्धवट अवस्थेतच बंद पडली. त्यानंतर ढालेगाव बंधारा ते रेणाखळी अशी सुमारे १० कि.मी. अंतराची चार कोटी रुपयांची सुधारित जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली.रामपुरी रत्नेश्वर येथे विहीर, गावापर्यंत पाईपलाईन, पाण्याची टाकी व फिल्टर यंत्रणा उभारण्यात आली; मात्र प्रत्यक्षात गावातील नळ कोरडेच आहेत. अनेक कुटुंबांना आजही मोटारसायकलवर कैनी बांधून शेतातून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे “हर घर जल”ची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, आधीची ७० लाखांची योजना अर्धवट सोडून देण्यात आली आणि त्याच गुत्तेदाराला पुन्हा चार कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. “काम रखडते आणि जनता तहानलेलीच राहते,” अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांतून उमटत आहे.दरम्यान, पाईपलाईन टाकण्यासाठी गावातील सिमेंट रस्ते खोदण्यात आले; मात्र त्यांची दुरुस्ती न झाल्याने खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वृद्ध, विद्यार्थी व दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.हवामान खात्याने “अल निनो” प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता व्यक्त केली असताना रेणाखळीसमोरील पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे दोन्ही योजनांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.प्रतिक्रियायाबाबत जीवन प्राधिकरण परभणीचे ज्युनिअर इंजिनिअर इमरान शेख यांनी सांगितले की, “सदर काम संथ गतीने सुरू असल्याबाबत संबंधित गुत्तेदाराला वेळोवेळी पत्र देण्यात आले असून त्याच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.”

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close