ताज्या घडामोडी

विधान परिषदेच्या तोंडावर धोंडे जेवण पॉलिटिक्स

परभणीत आता ‘चाय पे चर्चा’ नाही, ‘धोंड्यावर चर्चा’!

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

सध्या जिल्ह्यात कडक उन्हाळ्यासोबतच राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. निमित्त आहे आगामी विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी!या रणधुमाळीत मतदारांना आणि इतर पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी परभणीत सध्या एक नवाच राजकीय पॅटर्न समोर आला आहे,तो म्हणजे ‘धोंडे जेवण’ पॉलिटिक्स! .

एरवी जावयाचे लाड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या अधिक मासाचा (धोंडे महिना) वापर आता परभणीतील राजकारणी थेट ‘राजकीय लाड’ आणि ‘फिल्डिंग’ लावण्यासाठी करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

​परभणी विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वतीने परभणी मेडिकल कॉलेज आणि आर.पी. हॉस्पिटल येथे एका भव्य ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण या कार्यक्रमाची खरी चर्चा जेवणापेक्षा तिथे जमलेल्या ‘राजकीय’ मांदियाळीमुळे रंगली आहे.

​या कार्यक्रमाला पाथरी विधानसभेचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी,शहर जिल्हाध्यक्ष रविराज दादा देशमुख,युवा नेतृत्व तारेक खान दुर्राणी, आणि उपसरपंच सलमान भाई यांच्यासह परभणी जिल्ह्यातील बड्या नगरसेवकांनी हजेरी लावली.एरवी एकमेकांसमोर शड्डू ठोकणारे नेते जेव्हा अशा धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खांद्याला खांदा लावून बसतात, तेव्हा राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण येणे स्वाभाविकच आहे.

​यशवाडी देवस्थान येथेही ‘खासदार’ स्टाईल धोंडे जेवण!

​दुसरीकडे,यशवाडी देवस्थान येथे खुद्द खासदार बंडु जाधव यांच्या वतीने अधिक मासानिमित्त जाहीर धोंडे जेवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमालाही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तुफान गर्दी केली होती.आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ‘एक एक मत’आणि ‘एक एक कार्यकर्ता’ किती महत्त्वाचा आहे, हेच या गर्दीवरून अधोरेखित होत आहे.

​काय आहे हे ‘धोंडे जेवण’ पॉलिटिक्स?

​हिंदू संस्कृतीत अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या महिन्यात जावयाला विष्णूचा अवतार मानून त्याला धोंडे (अनारसे) आणि चांदीचे वाण देऊन त्याचे लाड केले जातात.मात्र, परभणीच्या राजकारण्यांनी या परंपरेला थेट ‘इलेक्शन मोड’वर आणून ठेवले आहे.

​”इथे जावई महत्त्वाचा नाही,तर ‘मतदार’ आणि ‘सहकारी नेते’ हेच सध्या राजकीय अवतार बनले आहेत!” अशी मिश्किल टिप्पणी सध्या परभणीच्या चौकाचौकात ऐकायला मिळत आहे.

​पडद्यामागे नक्की काय शिजतंय?

​विधान परिषदेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. अशा वेळी जाहीर सभा किंवा राजकीय बैठका घेतल्या तर विरोधकांच्या नजरा असतात आणि आचारसंहितेचा ससेमिरा पाठीमागे लागतो.
यावर परभणीच्या नेत्यांनी शोधलेला ‘धोंडे जेवणाचा’ हा तोडगा सध्या चांगलाच यशस्वी ठरताना दिसत आहे.
​जेवणाच्या बहाण्याने ‘गुफ्तगू’ साधली जात आहे.​बंद दाराआड अत्यंत गंभीर विषयांवर खलबतं सुरू आहेत.
​दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपलंसं करण्यासाठी पुरणपोळीचा गोडवा वापरला जात आहे.

​परभणीत आता ‘चाय पे चर्चा’ नाही, ‘धोंड्यावर चर्चा’!

​या धोंडे जेवणामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत कोणाचे ‘धोंडे’ उडणार आणि कोणाला ‘गोड’ घास मिळणार,हे येणारा काळच ठरवेल.पण सध्या तरी परभणीच्या राजकारणात या ‘धोंडे जेवण’ पॉलिटिक्सने चांगलाच धुरळा उडवून दिला आहे,एवढं मात्र नक्की!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close