ताज्या घडामोडी

ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक‍ व्हावे – जिल्हाधिकारी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

ग्राहक दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

प्रत्येक नागरिक दैनंदिन जीवनात ग्राहक असून, त्याला भारतीय संविधानाने दिलेले हक्क सर्वप्रथम समजून घ्यावेत आणि आपल्या हक्कांबाबत जागरुक राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. गावडे बोलत होते.

या चर्चासत्राला अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती संध्या बारलिंगे, विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष लांडगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत अध्यक्ष ॲड. विलास मोरे, भारतीय स्टेट बँकेचे आर्थिक सल्लागार श्री. हट्टेकर, सायबर सेलचे गणेश कौटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरवर्षी 24 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या ‘कन्झुमर प्रोटेक्शन इन द इरा ऑफ ई-कॉमर्स ॲन्ड डिजीटल ट्रेडस्’ या संकल्पनेवर आधारित हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

प्रत्येक ग्राहकांना ग्राहक संरक्षण आयोगाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काबांबत जागरुक असणे गरजेचे असून आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल ग्राहक संरक्षण आयोगाकडे तक्रार करण्याचे प्रतिपादन श्री. गावडे यांनी यावेळी केले.

ग्राहकांना सुरक्षेचा, निवडीचा, माहितीचा आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार आहे. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सरकारने ग्राहक संरक्षण कायद्याची अमंलबजावणी सुरवात केली. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती बारलिंगे यांनी सन 2019 मध्ये झालेल्या कायद्यामधील सुधारनेची माहिती दिली. ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यवहार सुद्धा आता ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे दाखल केल्या पाहिजेत. त्यांच्या तक्रारी सकारात्मकपणे आयोगाकडून विनाविलंब निकाली काढल्या जातात तसेच ग्राहकांनी त्यांच्या हक्कांबाबत योग्यत ती माहिती घ्यावी. विविध विषयाशी निगडीत तक्रारींचा प्रभावीपणे निपटारा करण्यासाठी शेतकरी किंवा ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी, दक्षता आणि टाळावयाच्या चुका याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. जिल्ह्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण परिषदेचे सदस्य दक्षता समितीचे शासकीय सदस्य, बार कौन्सिलचे पदाधिकारी-वकील, शेतकरी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विलास मोरे व गणेश कौटकर यांनीही उपस्थितींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती शारदा चौडेंकर तर आभार प्रदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close