दिव्यांग बांधवांसाठी आधार व प्रमाणपत्र पडताळणी कॅम्प उत्साहात संपन्न

द
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. १ एप्रिल २०२६ रोजी पाथरी तहसील कार्यालय येथे तहसीलदार एस .एन .हांदेशवार यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी व आधार कार्ड प्रमाणीकरणासाठी विशेष कॅम्प मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कॅम्पमध्ये दिव्यांग नागरिकांच्या विविध शासकीय कागदपत्रांची पडताळणी, आधार कार्ड प्रमाणीकरण तसेच आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी सतीश राऊत, भीमराव लांडगे आणि परमेश्वर पवार यांनी विशेष परिश्रम घेत दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
या कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख दिपक खुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना मोठा फायदा झाला.
एकूणच, दिव्यांग बांधवांच्या सुविधा आणि सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेला हा कॅम्प अत्यंत यशस्वी ठरला असून, अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.









