रोमहर्षक तिरंगी लढतीत शिवसेनेचे आसेफ खान यांची सरशी

पाथरी नगराध्यक्षपदी ऐतिहासिक सत्ता परिवर्तन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी नगरपरिषद निवडणुकीतील निकालाने शहरातील तब्बल दोन आठवड्यांपासूनची उत्सुकता अखेर संपली. आज, रविवार दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास अत्यंत चुरशीच्या व चढ-उताराच्या लढतीत शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार आसेफ खान यांनी काँग्रेसचे जुनैद खान दुर्राणी यांचा ४३६ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले.
या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे 12 नगरसेवक तसेच शिवसेना शिंदे गटाचे नऊ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.
या तिरंगी लढतीत आसेफ खान यांना १०,६२६ मते, काँग्रेसचे जुनैद खान दुर्राणी यांना १०,१९० मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मोहित अन्सारी उर्फ मास्टर यांना ५,३७२ मते मिळाली.
फेरीवर फेरीत रंगला थरार
मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून लढत अटीतटीची ठरली.
पहिल्या फेरीत जुनैद खान ११९ मतांनी आघाडीवर,
दुसऱ्या फेरीत ही आघाडी ६८२ मतांपर्यंत वाढली,
तिसऱ्या फेरीत आसेफ खान ९३ मतांनी पुढे,
चौथ्या फेरीत आघाडी केवळ १९ मतांवर,
पाचव्या फेरीत आसेफ खान १२३ मतांनी आघाडीवर,
सहाव्या व अंतिम टप्प्यात अवघी ६०० मते शिल्लक असताना आघाडी ४३६ मतांवर स्थिरावत आसेफ खान विजयी ठरले.
३५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात
गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून पाथरी नगरपरिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाध्यक्ष सईद खान यांनी आपला प्रभाव दाखवत सत्ता खेचून आणली आणि आपल्या बंधू आसेफ खान यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक “गड आला, पण सिंह गेला” अशी ठरली.
काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले असले, तरी नगराध्यक्षपद गमवावे लागल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीला अपयश
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष व आमदार राजेशदादा विटेकर यांनी पाथरीवर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना केवळ दोन नगरसेवकांवर समाधान मानावे लागले, तसेच त्यांचे उमेदवार मोहित अन्सारी यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सत्तेत असूनही जनतेचा नकार
राज्य शासनात सत्तेत असूनही आमदार विटेकर यांना पाथरीतील जनतेने नाकारल्याची चर्चा आहे. साईबाबा विकास आराखडा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून आणलेल्या ९१ कोटींच्या विकास आराखड्याच्या श्रेयावरून झालेल्या राजकीय वादामुळे जनतेत नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात असून त्याचा फटका निवडणुकीत बसल्याचे मानले जात आहे.
प्रतिष्ठेची लढाई, सईद खान यांचा विजय
चार वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी ती प्रतिष्ठेची केली होती. मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचीही चर्चा मतदारांमध्ये होती. अखेर मतदारांनी नव्या जोशात उतरलेल्या सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत पाथरी नगरपरिषदेची सत्ता शिवसेना (शिंदे गट) कडे सोपवली.
या रोमहर्षक तिरंगी लढतीत आसेफ खान यांचा विजय, काँग्रेसच्या दीर्घकालीन सत्तेचा अस्त आणि राष्ट्रवादीचे अपयश — अशा त्रिसूत्रीने पाथरीच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे.









