आलेसूर–डोंगरला रस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
आ

प्रतिनिधी:विश्वनाथ मस्के
आलेसूर ते डोंगरला जाणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या रस्त्याचा वापर रोज शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण तसेच वाहतूकदार मोठ्या प्रमाणात करतात. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे कठीण झाले असून विद्यार्थ्यांना शाळा–महाविद्यालयात जाताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांकडून वारंवार मागण्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात होते; मात्र निवडणूक संपल्यानंतर ही आश्वासने हवेत विरतात, असा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
जर लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.









