डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे प्रस्ताव 22 फेब्रुवारीपर्यंत पर्यंत सादर करा

जिल्हा प्रतिनिधी अहमद अन्सारी परभणी
परभणी, दि. 15/02/2025. राज्यातील नोंदणीकृत मदरशाच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे 2024-25 साठीचे प्रस्ताव 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत पात्र मदरशांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, या योजने अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरशांनी त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे पाठवावेत. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या दिनांक 11 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र मदरशांची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत.
तसेच राज्यातील नोंदणीकृत शाळांच्या आधुनिकीकरणासाठी धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2024-25 मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2015 अन्वये या योजने अंतर्गत पात्र शाळांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर 2024 अन्वये सदर योजनेअंतर्गत पायाभूत सोयीसुविधेसाठी देण्यात येणार्या अनुदानाची रक्कम 2 लाखा वरून वाढवून 10 लाख करण्यात आली आहे.
शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र शाळांची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा व इच्छुक शाळांकडून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे मदरशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावा. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्ताव शासनास 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पाठवावेत, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.