ताज्या घडामोडी

संतश्रेष्ठ श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या हरी – हर ऐक्याचा अद्वैत सिद्धांत गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ होणार

सिनेट सदस्य सौ. किरण संजय गजपुरे यांच्या प्रस्तावाला सिनेट सभागृहाची मंजुरी.

प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड

संतश्रेष्ठ श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या हरी – हर ऐक्याचा अद्वैत सिद्धांत गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याबाबतचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत एकमताने मंजुर करुन तो पुढील कार्यवाहीसाठी अभ्यासमंडळाकडे पाठविण्याचे ठरले असल्याची माहिती सिनेट सदस्य सौ. किरण संजय गजपुरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. १३ व्या शतकात अनेक संत होऊन गेलेत. त्यात सर्वात जेष्ठ संत म्हणून श्री शिरोमणी नरहरी महाराज यांचे नाव घेतल्या जाते. पण संत परंपरेतील इतर संतांप्रमाणे यांचे साहित्य अजूनही दुर्लक्षित आहेत. हरीहर ऐक्याचा पहिला सिद्धांत संत नरहरी महाराज यांनी तेराव्या शतकात मांडला. संत नरहरी महाराजांचा जन्म ११९३ साली झाला व मृत्यू १२८५ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अच्युत बाबा तर आईचे नाव सावित्रीबाई होते. त्यांच्या पत्नीचे नाव गंगाबाई होते.
आपल्या ९२ वर्षाच्या आयुष्यात केवळ ३० ते ३५ अभंग लिहिलेत. पण त्या अभंगातील अविट गोडी , ओतप्रोत भरलेला भक्तीरस, हरिहर ऐक्याचा मांडलेला अद्वैत सिद्धांत, आपल्या व्यवहाराचे ( धंद्याचे ) व प्रपंचाचे ( कुटुंब , पत्नी ) यांचा परमार्थाशी जोडलेले नाते , प्रसाद व माधुर्य हे गुण त्यांच्या अभंगात आहेत. नरहरी महाराज हे शंकराचे म्हणजे शिवाचे भक्त होते, पण पंढरपुरात वास्तव्य असूनही ते कधीच विठ्ठलाचे दर्शन घेत नव्हते. पण काही साक्षात्कारानंतर विठ्ठल ( हरी ) व शंकर ( हर ) हे वेगळे देव नसून ते एकच आहेत हा हरि-हर ऐक्याचा अद्वैत सिद्धांत त्यांनी मांडला व तो पुढे खरा करून दाखवला. नंतर संत ज्ञानेश्वरांनी स्थापन केलेल्या वारकरी भागवत संप्रदायात ते आजीवन सहभागी राहिलेत.
संत नरहरी महाराजांच्या जेष्ठत्व , श्रेष्ठत्व , भक्तीतील दिव्यत्व , हरीहरातील एकत्व पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन महान होता हे संत ज्ञानेश्वर माऊली , संत नामदेव महाराज यांनी सुद्धा कबुल केले आहे. त्यांच्या अंतसमयी विठ्ठलाच्या कटी सूत्राचे ( कंबरेजवळ करदोळा बांधला ते ठिकाण ) ठिकाणी कायमचे स्थान पांडुरंगा जवळ मागून घेतले. विठ्ठल मूर्तीच्या कंबरेजवळ कटीला आलिंगन देऊन ज्यांनी आपला देह सोडला असे महाराष्ट्रातील एकमेव संत म्हणजे संत नरहरी महाराज आहेत.
अशा संतश्रेष्ठ श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या हरी- हर ऐक्याचा सिद्धांत गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करून संतश्रेष्ठ नरहरी महाराजांची महती व ऐक्याचा सिद्धांत अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावा असा प्रस्ताव सिनेट सदस्य सौ. किरण संजय गजपुरे यांनी नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत मांडला होता. या प्रस्तावाला सभागृहात उपस्थित सर्वच सदस्यांनी एकमताने समर्थन दिल्याने कुलगुरु प्रा. प्रशांत बोकारे यांनी तो प्रस्ताव स्वीकारला व पुढील कार्यवाहीसाठी अभ्यास मंडळाकडे पाठविण्यात येत असल्याची घोषणा करीत मंजुरी दिली .
संतश्रेष्ठ नरहरी महाराजांचा हा हरी- हर ऐक्याचा अद्वैत सिध्दांत अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निश्चितच समाजप्रबोधनासाठी व अजुनही दुर्लक्षित श्रेष्ठ संतपरंपरेचा अभ्यास करण्यासाठी हा विषय आवडीचा व माहितीचा ठरेल असा आशावाद याचे प्रस्तावक सिनेट सदस्य सौ. किरण संजय गजपुरे यांनी व्यक्त केला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close