मुलगा होत नसल्याने विवाहितेस घराबाहेर काढले
जांबमधील सासरच्या 5 जणांविरूद्ध दैठण्यात पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करीत तिला दोन वेळा घराबाहेर हाकलुन देणार्या सासरच्या 5 जणांविरूद्ध विवाहितेच्या तक्रारीवरून दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या भरोसा सेलमध्ये चार बैठका झाल्यानंतरही समजोता न झाल्याने विवाहितेने पतीसह सासु व दिरांसह अन्य मंडळींविरोधात या संदर्भात फिर्याद दिली.
याबाबत माहिती अशी, दैठणा येथील रहिवासी सोनाली कच्छवे हिचा विवाह 20 एप्रिल 2017 रोजी जांब येथील धनंजय श्रीहरी बडगुजर याच्यासोबत मोठ्या थाटामाटात रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. सासरी गेलेल्या सोनालीला पहिली मुलगी झाल्यानंतर सासरची मंडळी तिच्यावर सातत्याने नाराज होती. त्यानंतर तिला दुसरी मुलगीच झाली. तेंव्हापासून पती धनंजय, सासु सुशिला बडगुजर, दिर विपुल श्रीहरी बडगुजर यांनी तिला मानसिक त्रास देण्याबरोबरच उपाशीपोटी ठेवण्याचे काम केले. सातत्याने टोमणे मारून मानसिक त्रास दिला. चुलत दिर ज्ञानेश्वर बडगुजर व जाऊ निकीता बडगुजर यांनीही त्यांना प्रोत्साहन देत सोनालीचा छळ सुरूच ठेवला. मार्च 2020 मध्ये त्यांनी तिला घरातुन हाकलून दिल्यानंतर ती माहेरी दैठणा येथे वास्तव्यास आली होती. मात्र भाऊ व इतर नातेवाईकांनी समजावुन सांगितल्यानंतर मे मध्ये ती सासरी नादण्यास गेली होती. त्यानंतरही मुलगा न झाल्याच्या कारणावरून व चारीत्र्य चांगले नसल्याच्या नावाखाली या मंडळींनी पुन्हा तिला मारहाण करून 22 मे 2022 रोजी जिवे मारण्याची धमकी देत घराबाहेर हाकलुन दिले. त्यानंतर तिने भरोसा सेलमधून अर्ज दाखल केल्यानंतरही सासरच्या मंडळींनी तडजोड न केल्याने सोनाली बडगुजर हिने दिलेल्या फिर्यादीवरून दैठणा पोलिस ठाण्यात पती, सासु, दिर व जावु अशा पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.