कराड कार्वेतील युवकास पाठलाग करून गोंदी येथे मारहाण… युवक जखमी

अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधीःप्रमोद राऊत कराड
गोटखिंडी (जि.सांगली) येथील बहिणीकडुन जेवण करुन कार्वेतील घरी निघालेल्या युवकास स्विफ्ट कारमधुन आलेल्या सहाजणांनी पाठलाग करुन मारहाण करत जखमी केल्याची घटना काल रात्री गोंदी (ता. कराड) गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी संकेत सुरेश मंडले (वय २५. रा. कार्वे) याने फिर्याद दिली असुन त्यावरुन पोलिसांनी संबंधित अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संकेत मंडले हा त्याचा मित्र अमन मुबारक मुल्ला याच्याबरोबर गोटखिंडी (जि.सांगली) येथील बहिणीकडे जेवण करण्यासाठी दुचाकीवरुन गेले होते. ते परत येवुन कार्वेतील घरी जाताना गोंदीजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी अमन हा दुचाकीवरच बसला होता. त्यादरम्यान पाठिमागुन पाठलाग करत स्विफ्ट गाडीतुन (एमएच १२ एसक्यु ६७०५) आलेल्या सहा जणांनी संबंधित दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये अमन हा गाडीवरुन खाली पडला. संबंधित सहा जणांच्या हातात दगड आणि लोखंडी पाईप होती. ते अमनच्या मागे लागल्यावर तो ऊसाच्या शेतात पळुन गेला आणि संकेत मंडले हा त्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी संकेतला तु आसीफ मुलानी यास ओळखतोस का ? असे म्हणत त्याच्या पाठीवर, पायावर, पोटावर लाथाबुक्या आणि लोखंडी पाईपने मारहाण केली. तर दुचाकी गाडीचीही मोडतोड करुन नुकसान केले. त्यानंतर त्यांनी संकेतला गाडीतुन मारहाण करत रेठरे कारखाना रस्त्यालाही नेवुन तेथेही मारहाण केली अशी फिर्याद संकेत मदने याने दिली आहे. त्यावरुन संबंधित अनोळखी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बिद्री पुढील तपास करत आहेत.