विद्यापीठ आपल्या गावात या नाविण्यपुर्ण उपक्रमाची व्याप्ती

प्रतिनिधीः कल्यानी मुनघाटे नागभीड
गोंडवाना विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विद्यापीठ आपल्या गावात या नाविण्यपुर्ण उपक्रमाची व्याप्ती नागभीड , ब्रम्हपुरी , चिमुर , सिंदेवाही ,मुल व सावली या तालुक्यात वाढविण्यात येणार असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व आदर्श पदवी महाविद्यालय समिती सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी दिली असुन लवकरच नागभीड तालुक्यात पहिल्या केंद्राचा शुभारंभ होणार असल्याचे सांगितले आहे. गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आदर्श पदवी महाविद्यालय मार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे “ विद्यापीठ आपल्या गावात “ याची सुरुवात कुलगुरु डॅा. प्रा. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील जांभळी येथे सुरू करण्यात आली. जे विद्यार्थी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेलेले आहेत अश्या महाविद्यालय सोडलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून सायंकाळी महाविद्यालय भरवून शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येणारा एक आदर्श नावीन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
यामध्ये कला स्नातक (बि.ए) हा पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमामध्ये विविध कारणांमुळे महाविद्यालय सोडून रोजगारासाठी व पोटापाण्यासाठी विविध रोजीरोटीचे काम करणाऱ्या तरुण , तरुणीसाठी गोंडवाना विद्यापीठ प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत महाविद्यालय भरविते आणि त्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख होण्याकरिता या उपक्रमातून सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. सद्यस्थितीत विद्यापीठ कार्यक्षेत्रात ४ ठिकाणी केंद्र सुरु झाले असुन उदंड प्रतिसाद या उपक्रमाला लाभत आहे.
या उपक्रमामुळे इच्छा असुनही ज्यांना विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण करता आला नाही , अशांची पदवी प्राप्त करण्याची स्वप्नपुर्ती होणार आहे. सोबतच या तीन वर्षीय अभ्यासक्रमामध्ये रोजगाराभिमुख विषय अंतर्भूत केले असल्याने स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन आर्थिक सक्षमतेकडे नेण्यासाठी याची मदत होणार असल्याचे प्रतिपादन सिनेट सदस्या सौ.किरण संजय गजपुरे यांनी केले आहे . पहिल्या टप्प्यात नागभीड तालुक्यात तळोधी (बा.), उश्राळमेंढा , कोसंबी गवळी , चिंधीचक तर ब्रम्हपुरी तालुक्यात मेंडकी येथे विद्यापीठ आपल्या गावात केंद्राची स्थापना होणार आहे. सदर पदवी अभ्यासक्रम पुर्णपणे मोफत राहणार असुन कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. या उपक्रमाची नोंदणी सुरु झाली असुन परीसरातील जे विद्यार्थी प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असेल त्यांनी आपल्या सोयीच्या केंद्रातील ग्राम पंचायत कार्यालयात आपली नाव नोंदणी करून प्रवेश अर्ज करिता लागणारे मूळ प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.