मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात टाकणे ही लोकशाहीची हत्या- राजू झोडेंची टीका
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप आरोप स्पष्ट न करता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या करण्याचे काम केंद्र सरकार ईडी व सीबीआयच्या माध्यमातून करीत असल्याची टीका उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. निवडणुकीत भाजपला अपयश दिसत असून केंद्र सरकारचा झोडे यांनी निषेध केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रकारे टार्गेट करणे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे. अशा प्रकारे राजकारणाची पातळी घसरणे ना पंतप्रधानांना शोभते ना त्यांच्या सरकारला ! निवडणुकीच्या लढाईत तुमच्या टीकाकारांशी लढा, त्यांचा धैर्याने सामना करा आणि अर्थातच त्यांच्या धोरणांवर आणि कार्यशैलीवर हल्ला करा, ही लोकशाही आहे. परंतु अशाप्रकारे देशाच्या सर्व संस्थांच्या शक्तीचा वापर करून स्वत:चे राजकीय उद्दिष्ट पूर्ण करणे आणि दबाव आणून त्यांना कमकुवत करणे हे लोकशाहीच्या प्रत्येक तत्त्वाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे या सरकारला आता पायउतार करण्याची वेळ आली असल्याचीही टीका झोडे यांनी केली आहे.