ताज्या घडामोडी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे कमिटी (ZRUUCC ) ची १८ वी बैठक बिलासपुर येथे संपन्न

तालुका प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे कमिटी (ZRUUCC ) ची १८ वी बैठक बिलासपुर येथील रेल्वेच्या प्रशासकीय भवनात झोनल महाप्रबंधक आलोककुमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित झोनल रेल्वे कमिटीतील सदस्यांचा महाप्रबंधकाच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीत झोनल समिती सदस्य व चंद्रपुर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी रेल्वे संदर्भातील विविध समस्या मांडल्या .
सुरवातीला महाप्रबंधक आलोककुमार यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या विविध सेवा आणि सुविधांच्या विकासाची माहिती दिली. सोबतच विविध स्टेशन वर मिळालेल्या रेल्वे स्टॉपेज संदर्भात माहिती देत प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांची चित्रफित समिती सदस्यांना दाखविली यासोबतच अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेत समाविष्ट रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती पटलावर ठेवली.


या बैठकीत झोनल रेल्वे कमिटी (ZRUUCC ) सदस्य संजय गजपुरे यांनी चांदा फोर्ट – नागभीड – गोंदिया मार्गावरील विविध स्टेशन वरील रेल्वे प्रवाश्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न मांडून त्यावर त्वरित कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली.
यात प्रामुख्याने गाडी क्र. ०८८०८ वडसा- नागभीड – चांदा फोर्ट मेमु पॅसेंजर हि सकाळी १० वाजे पर्यंत चंद्रपूरला पोहचणारी रेल्वे गाडी १० आगष्ट २०२३ पासून कुठलेही कारण न दर्शविता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिले. हि गाडी जिल्हा स्थानावर जाण्यासाठी सर्वांच्याच सोयीची असल्याने गाडी क्र. ०८८०८ वडसा- नागभीड – चांदा फोर्ट मेमु पॅसेंजर यासह गाडी क्र. ०८००५ चांदा फोर्ट – नागभीड – गोंदिया मेमु पॅसेंजर व गाडी क्र. ०८८०६ गोंदिया – वडसा मेमु पॅसेंजर त्वरित सुरु करण्याची मागणी केली आहे. यावर रेल्वे महाप्रबंधकांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे कबुल केले.


बल्लारशाहा – नागभीड – गोंदिया मार्गावर चालणाऱ्या सर्व पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या नियोजित वेळेवर पोहचत नसल्याने यावर उपाय योजना करण्याची मागणी केली. त्यावर हा मार्ग सिंगल लाईन चा असल्याने व या मार्गावर पंसेंजर व एक्सप्रेस गाड्यांसह मालगाड्यांची हि वाहतूक अधिक असल्याने हा त्रास सुरु असल्याचे कबुल करीत या मार्गावर लवकरच दुसऱ्या लाईन चे काम अंतिम मंजुरीसाठी असल्याचे सांगत येत्या काही दिवसात हा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे.
बल्लारशाहा – नागभीड – गोंदिया मार्गावर चालणाऱ्या जबलपूर – चांदा फोर्ट ( २२१७४ / २२१७३ ) या सुपरफास्ट गाडीला मुल,सिंदेवाही ,ब्रम्हपुरी ,वडसा ,मोरगाव अर्जुनी व सौन्दड या स्टेशन वर स्टॉपेज देण्याची मागणी केली. हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावा असे ठरले. नागभीड जंक्शन या महत्वपूर्ण रेल्वे स्टेशनचा समावेश अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेच्या द्वितीय चरणाच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. नागभीड रेल्वे जंक्शन स्टेशन वर जेनेरिक मेडिकल स्टोर्स लवकरच सुरु होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नागभीड जंक्शन स्टेशन चे या मार्गावरील स्थान लक्षात घेता व प्रस्तावित नागपूर – नागभीड ब्रॉडगेज चे काम सुरु असल्याने या ठिकाणी अत्याधुनिक नवीन स्टेशन बिल्डींग बनविण्यात येणार आहेत. इंग्रज काळापासून या मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वे बंद झाल्याने नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशन चा विकास मॉडेल स्टेशन म्हणून करण्यात येऊन या रेल्वेस्टेशन परिसरात नवीन रेल्वे संग्रहालय व नॅरोगेज रेल्वे इंजिन ची स्थापना हेरीटेजच्या स्वरुपात करण्याचा संजय गजपुरे यांचा प्रस्ताव महाप्रबंधकांनी स्वीकारून त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यास स्वीकृती दर्शविली.
उपरोक्त विविध मागण्यांसह गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांनी सुचविलेल्या तळोधी बा. रेल्वे स्टेशन वर दुसऱ्या नवीन प्लॉटफार्म ची निर्मिती, नागपूर – नागभीड ब्रॉडगेज चे काम लवकरात लवकर पूर्ण करणे नागभीड स्टेशन वर मालगाडी साठी यार्ड बनविणे व नवीन रेल्वे कोचिंग डेपो पिट लाईन बनविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
बल्लारशाहा – नागभीड – गोंदिया मार्गावर चालणाऱ्या पॅसेंजर / मेमु गाड्यांमध्ये शौचालयांची अस्वच्छता नेहमीच राहत असल्याने याकडे तातडीने सुधार करण्याची मागणी करण्यात आली. सोबतच समिती सदस्यांकडे प्रवाश्यांकडून सूचना मिळण्यासाठी सदस्यांच्या मोबाईल क्रमांकासह बोर्ड लावण्याचे बैठकीत मंजूर करण्यात आले. या बैठकीचे आभार प्रदर्शन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे उपमहाप्रबंधक समीर कुमार यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close