विदर्भ राईस इंडस्ट्रीज असोसिएशनच्या महाअधिवेशन संपन्न
केन्द्रीय भुपृष्ठ आणि जहाज परिवहनमंत्री मान.श्री. नितीन जी गडकरी यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती
तांदूळ निर्यातीसह अनेक विषयांवर मंथन
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक राईस मिलर्सचे महाअधिवेशन शनिवार १८ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या सात वचन लॅानवर झाले. या कार्यक्रमाला केन्द्रीय भुपृष्ठ आणि जहाज परिवहनमंत्री नितीन गडकरी, गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे यांच्यासह पूर्व विदर्भातील आमदारांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या अधिवेशनात तांदळाच्या निर्यातीसह तांदूळ उद्योगाला अधिक बळकटी देण्यातील अडचणींवर मंथन करण्यात आले.
या महाअधिवेशनात देशातील प्रमुख मशिनरी निर्मात्यांनी आपल्या अत्याधुनिक टेक्नालॉजींनी युक्त मशीन्सचे प्रदर्शन लावले होते. कार्यक्रमाचे प्रायोजक बंगलोर येथील श्री अॅग्री प्रोसेस इनोवेशन टेक एल.एल.पी. हे होते. महाअधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील भात उद्योगाची देशपातळीवर उपयोगिता या विषयावर प्रकाश टाकण्यात आला.
पूर्व विदर्भातील तांदूळ उद्योगातून देश आणि विदेशात दरवर्षी १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ही बाब विदर्भासह देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणारी आहे. पूर्व विदर्भात सरासरी दरवर्षी १० लाख मे.टनपेक्षा अधिक तांदूळ निर्यात होतो. यातून देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा प्राप्त होते. असे असताना निर्यातीवर लादलेली बंदी राईस मिल उद्योगांसाठी घातक आहे. अनेक राईस मिल्स बंद पडल्या आहेत. त्याला पुन्हा बळकटी देण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
तांदूळ निर्यातीवरील बंदी उठवावी, वीज बिलात दोन रुपये प्रतियुनिट सबसिडी द्यावी, कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर हा बाजार समितीच्या प्रांगणाबाहेर लावला जाऊ नये अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या.