ताज्या घडामोडी

परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर येथे श्रीविजयादशमी उत्सवाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथील परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात श्री साई स्मारक समिती पाथरीच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 ते गुरुवार दिनांक 26 आॅक्टोबर 2023 या काळात श्रीविजयादशमी उत्सव साजरा होत असल्याची माहिती समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त अॅड. श्री अतुलराव चौधरी यांनी दिली.
या महोत्सवा विषयी बोलताना चौधरी म्हणाले की, अश्विन शुद्ध दशमी परमपूज्य श्रीसाईबाबांचा महासमाधी दिवस म्हणून देशभरात साजरा केला जात असून, परमपूज्य श्रीसाईबाबांचे सन 1918 च्या विजयादशमीला महानिर्वाण झाल्यानंतर श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथे “श्रीसाईबाबा महासमाधी” म्हणून हा उत्सव साजरा करतात, तीच परंपरा साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्री साई स्मारक समिती, पाथरीने मंदिर स्थापनेपासून मागील 24 वर्षापासून जोपासली आहे. यावर्षीही समाधी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून उत्सवातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. पहाटे 5:15 वाजता श्री साईबाबांची काकड आरती, सकाळी 6:20 वाजता श्रींचे मंगल स्नान व दर्शन, सकाळी सात वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती व त्यानंतर श्रींची पाद्यपूजा, सकाळी आठ वाजता अभिषेक व विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता श्रींची पाद्यपूजा, सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती नंतर पालखी मिरवणूक व हरिपाठ, सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या वेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होईल, रात्री नऊ वाजता शेजारती होईल व नंतर मंदिर बंद होईल.


तसेच मुख्यत्वेकरून सोमवार दिनांक 23 आॅक्टोबर 2023 रोजी पहाटे 5:45 वाजता श्रींच्या फोटोची व श्री साईसच्चरित्र ग्रंथाची मंदिर ते द्वारकामाई मिरवणूक निघेल व मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर अखंड श्री साईसच्चरित्र पारायणास प्रारंभ होईल, दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत श्री ह भ प अंगद महाराज डाके गुरुजी, यांची कीर्तन सेवा, मंगळवार वार दिनांक 24 आॅक्टोबर 2023 रोजी पहाटे 5:45 वाजता श्री साईसच्चरित्र पारायणाची समाप्ती होईल व श्रींच्या फोटोची व श्रीसाईसच्चरित्र ग्रंथाची द्वारकामाई ते मंदिर अशी मिरवणूक निघेल, सकाळी नऊ वाजता धूनी पूजा, सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत श्री ह भ प अंगद महाराज डाके गुरुजी गव्हाणकर, यांची श्रीविजयादशमी विशेष कीर्तन सेवा होईल, त्यानंतर श्री. संतोषराव चौधरी यांचे शुभहस्ते त्यांचे निशाणाचे पूजन व निशाण मंदिराचे शिखरावर उभारले जाईल, सायंकाळी 4:30 वाजता श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक निघेल. तिसऱ्या दिवशी दुपारी तीन ते पाच या वेळेत एकादशीनिमित्त श्री ह भ प अंगद महाराज डाके गुरुजी यांची कीर्तन सेवा होईल. आणि सांगता दिवशी गुरुवार दि. 26 आॅक्टोबर मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री ह भ प अंगद महाराज डाके गुरुजी गव्हाणकर, यांची गोपाळकाल्याच्या कीर्तनाची सेवा होईल व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. ज्या साई भक्तांना अखंड पारायणात सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी आपली नावे दिनांक 22 आॅक्टोबर 2023 पूर्वी श्री सुधाकर नारायण बेदरे (मो.7559134128) यांच्याकडे समक्ष किंवा फोन वरून नोंदवावीत. अशी माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त अॅड. श्री अतुलराव चौधरी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close