केंद्रीय भूजल बोर्डाच्या वतीने जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
केंद्रीय भूजल बोर्ड नागपूरच्या वैज्ञानिकांनी आज बुधवार,(दि. १४) रोजी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा सादर केला. केंद्रीय भूजल बोर्डाच्या वैज्ञानिकांनी मराठवाड्यातील परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांचा २०१९-२० मध्ये अभ्यास करून हा आराखडा सादर केला.
हा आराखडा केंद्रीय भूजल बोर्डाच्या वैज्ञानिक श्रीमती निलोफर व आश्विन आटे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्याकडे सादर केला. या आराखड्यामध्ये परभणी जिल्ह्यात पाण्याची भूजल पातळी, भूजलाचे व्यवस्थापन, सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता आणि कोणत्या तालुक्यात पाण्याची आवश्यकता आहे, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी हा भूजल व्यवस्थापन आराखडा परभणी जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून याचा भविष्यात जिल्ह्याला पाणीपातळीमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने उपयोग करता येईल. जिल्ह्यातील भूजल पातळीचा अभ्यास आणि त्यामध्ये करावयाच्या उपाययोजना, जिल्ह्यातील नागरिकांना जलसाक्षर करण्याकामी मदतच मिळेल, याबाबत वैज्ञानिकांकडून माहिती जाणून घेतली. तसेच राज्य् शासनाच्या जलयुक्त शिवार टप्पा -२ यामध्ये या भूजल व्यवस्थापन आराखड्याचा मोठा लाभ होईल, अशा आशावाद व्यक्त केला. या भूजल व्यवस्थापन आराखड्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याची खालावत जाणारी पातळी याबाबतची माहिती देऊन त्यांना जलयुक्त शिवार योजनेमध्ये सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी वैज्ञानिकांशी चर्चा करताना सांगितले.